Pravin Tarde shares video: प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद’ हा सिनेमा २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली होती. विशेषत: राघव शास्त्री या पात्राने सर्वांच्या मनावर राज्य केले. गश्मीर महाजनीने ही भूमिका साकारली होती. अभिनेत्याला या सिनेमातून लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळेच जेव्हा देऊळ बंद २ या सिनेमाची घोषणा झाली, त्यावेळी राघव शास्त्री या सिनेमात दिसणार का, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता.
याबरोबरच, जेव्हा देऊळ बंद २ या सिनेमात जेव्हा प्रेक्षकांनी गश्मीरला पाहिले, त्यावेळी त्यांनी आनंद व्यक्त केला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या होत्या. देऊळ बंद या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यांत या सिनेमाने ६०.५० कोटींची कमाई केली आहे.
प्रवीण तरडेंनी अनोख्या पद्धतीने दिल्या गश्मीर महाजनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आता प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करीत गश्मीरला वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, प्रवीण तरडे व स्नेहल तरडे त्यांच्या टीमसह थिएटरमध्ये प्रेक्षकांना भेटण्यासाठी गेले आहेत. व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे म्हणतात की, आज सोमवार आहे. सोमवारीसुद्धा देऊळ बंद २ चित्रपटावर प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग कसा आहे ते बघायचा आहे का? १९ वा दिवस आहे आणि ही आहे ‘देऊळ बंद २’ला आलेली गर्दी. असे म्हणत ते प्रेक्षकांनी भरलेले थिएटर दाखवतात.
पुढे ते म्हणतात की, आज ८ जून आहे. आपल्या लाडक्या राघव शास्त्रीचा म्हणजे गश्मीर महाजनीचा वाढदिवस आहे. गशूदादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यानंतर त्यांनी प्रेक्षकांनासुद्धा हॅपी बर्थडे म्हणायला सांगितले.
गश्मीरने या व्हिडीओवर कमेंट करीत, “खूप खूप धन्यवाद”, असे लिहीत हार्ट इमोजी शेअर केल्या. तसेच, श्री स्वामी समर्थ असेही लिहिले. अमृता खानविलकरने यावर कमेंट करीत कमाल, असे लिहिले आहे. तसेच, अनेक नेटकऱ्यांनी गश्मीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर अनेकांनी श्री स्वामी समर्थ, असे लिहिले आहे.
याबरोबरच, गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याचा वाढदिवस साजरा केल्याचे दिसत आहे. ढोल वाजवला जात असून, तो केक कापत असल्याचे दिसत आहे.
आता गश्मीर कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
