Priya Bapat and Umesh Kamat: प्रिया बापट व उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील लाडकं जोडपं आहे. त्यांचे सिनेमे, त्यांच्या भूमिका, नाटक, सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो या सगळ्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

प्रिया आणि उमेश यांनी जर तरची गोष्ट, आणि काय हवं, बिनलग्नाची गोष्ट, टाईम प्लीज अशा विविध कलाकृतींमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जर तरची गोष्ट या नाटकाला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. या नाटकाचे प्रयोग परदेशांतही होतात. सोशल मीडियावर अनेक चाहते या नाटकाचे वेळोवेळी कौतुक करताना दिसतात.

आता प्रिया बापट व उमेश कामत लवकरच हे काय नवीन या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता त्या निमित्ताने या कलाकारांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, एकत्र काम करताना काही नियम ठरवलेले असतात का?

Award Banner

“आम्हाला वेगळे नियम आखावे…”

त्यावर उमेश म्हणाला, “मला सगळ्यात आधी प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत. आम्हा तिघांना म्हणजे प्रिया, मी व दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी इतका आग्रह केला आहे. त्यामुळे आम्ही भारावून जातो. आता आम्ही ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक करत आहोत. त्याच्या प्रत्येक प्रयोगानंतर जर १०० लोक आम्हाला भेटायला येत असतील, तर त्यातील ५० लोक हे म्हणत असतात की, तुम्ही पुन्हा एकत्र कधी येणार? ‘आणि काय हवं’ या सीरिजचे इतके चाहते आहेत. त्यामध्ये सगळ्या वयोगटाचे लोक आहेत.”

पुढे तो म्हणाला, “मला वाटतं की, आम्ही एकमेकांबरोबर काम करताना मजा करतोच. आम्हाला वेगळे नियम आखावे लागत नाहीत. भूमिका एक्सप्लोअर करताना आम्हाला मजा येते, आम्ही त्याचा आनंद घेतो. तेच आम्ही ‘हे काय नवीन’ या सीरिजमध्येदेखील करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला नियम बांधावे लागत नाहीत. ते आपसूक तयार होतात. म्हणजे वरुणच्या सेटवर गेल्यानंतर कान उघडे ठेवायचे असतात. तो जे काही सांगतो, त्याप्रमाणे करायचे असते. प्रिया आणि मी इतके प्रोफेशनल कलाकार आहोत की, सेटवर कधीच नवरा-बायकोसारखे राहत नाही. आम्हाला स्वतंत्र कलाकार म्हणून राहायला जास्त आवडतं. मला तिचं काम बघायला आवडतं. घरात जसे वागतो, तसे कमी वागण्याचा सेटवर प्रयत्न करतो.”

“प्रोफेशनल वागण्याचा वेगळा प्रयत्न…”

प्रिया म्हणाली, “मला किंवा उमेशला प्रोफेशनल वागण्याचा वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. मला वाटतं की, आमच्या दोघांच्याही जडणघडणीमध्ये, स्वभावामध्ये ते इतकं रुजलेलं आहे की, आम्ही तसं काही ठरवून प्रोफेशनल वागत नाही. आपसूकच आमच्यामध्ये ते इतकं आहे की, एकमेकांना कलाकार म्हणून स्वातंत्र्य देणं आणि तिथे आपलं नातं आड येणार नाही ना, याची काळजी घेणं. याबद्दल कोणी आम्हाला किंवा आम्ही एकमेकांना सांगण्याची गरज पडली नाही.”

“ते परस्पर एकमेकांना…”

दिग्दर्शक वरुण नार्वेकर प्रिया आणि उमेश यांच्याबद्दल म्हणाले, “मला याबद्दल सांगावंसं वाटतं की, एक मूल्य किंवा तत्त्व त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आहे. ते म्हणजे काम करताना दोघांपैकी कोणी अडखळलं, तर ते परस्पर एकमेकांना सांगत नाहीत. दिग्दर्शक आणि ती व्यक्ती त्यावर काम करतात. उदाहरणार्थ, समजा एखाद्या सीनमध्ये उमेश अडखळतोय, तर मी आणि उमेशच त्यावर बोलतो आणि सुधारणा करतो. कधीच असं होत नाही की, सेटवर असताना प्रिया परस्पर त्याला काही सल्ला देत नाही.,जे त्यांच्यातील नात्यामुळे आपसूक होऊ शकतं.”

दरम्यान, प्रिया व उमेश यांची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज ३१ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.