प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी पाटील आणि उमेश कामत यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे नुकतेच ४०० प्रयोग पूर्ण झाले. हे नाटक रंगभूमीवर पहिल्या दिवसापासून हाऊसफुल सुरू आहे. ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त ‘जर तरची गोष्ट’ नाटकातील कलाकारांनी या प्रवासातील काही भन्नाट किस्से प्रेक्षकांबरोबर शेअर केले आहेत. एकदा वाक्य विसरल्यामुळे मध्येच प्रयोगही थांबला होता. हा भन्नाट किस्सा सुद्धा प्रियाने सांगितला आहे.
प्रिया बापट सांगते, “स्टेजवर कधी जागा वगैरे नसली तर एक बेंच आहे तो चिकटून ठेवतात. आता त्यानुसार आम्हाला आमचा रंगमंचावरचा वावर सुद्धा बदलावा लागतो. यामुळे Movement दरम्यान पल्लवी बोलता-बोलता वाक्य विसरली. ती नंतर शांतपणे माझ्याकडे बघायला लागली आणि मला चेहऱ्याने खुणावत होती. त्यामुळे मी माझं आधीचं जे वाक्य आहे ते रिपीट केलं म्हणजे हिला पुढच्या वाक्याचा लीड मिळेल. मी परत वाक्य बोलले… तरीही ती पुन्हा माझ्याकडे तशीच बघत होती. त्यानंतर मग मी पण ब्लँक झाले. इतकी ब्लँक झाले की, मला नाटकात काय सुरूये हेच आठवेना. मग मी शस्त्र टाकली…तिनेही ( पल्लवी ) शस्त्र टाकली. प्रयोग थांबवला आणि मी आमच्या लाइटमनला विचारलं…मी काय वाक्य म्हटलं होतं ते सांग जरा…”
यावर आशुतोष गोखले म्हणाला, “हे सगळं सुरू असताना मला विंगेतून दिसलं…उमेश वॉशरूममध्ये गेला होता कारण, आम्हा दोघांची तेव्हा नुकतीच स्टेजवरून एक्झिट झाली होती. मग शेवटी प्रियाने प्रेक्षकांची माफी मागितली. सॉरी आम्ही विसरलोय.”
प्रिया बापट पुढे म्हणते, “त्यानंतर प्रेक्षकही हसायला लागले. कारण, तिथे दुसरं काहीच सुचणं शक्य नव्हतं. मग मी जे वाक्य बोलले होते…ते प्रेक्षकांनी सुद्धा सांगितलं. त्यानंतर मग मी आशूला शोधलं…तो विंगेत उभा होता..त्याने लगेच मला वाक्य सांगितलं. पण, ते पल्लवीला ऐकूच आलं नाही. सुदैवाने ते वाक्य मी ऐकलं…मी ते वाक्य बोलले, त्यानंतर माझा डायलॉग आहे तो म्हटला..मग तिला सांगितलं की, आता इथून पिकअप कर. पुढे मग तिने पिकअप केलं आणि आमचा प्रयोग सुरू झाला.”
प्रियाने सांगितलेला हा भन्नाट किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या तीन वर्षांत या नाटकाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. या नाटकाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केलं आहे.
