Priya Bapat meets little fan Video: आपल्या आवडत्या कलाकारांना भेटण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते कित्येक दिवस वाट पाहत असतात.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा प्रिया बापटला भेटायचे असे म्हणत होता. हे काय नवीन या वेब सीरिजमध्ये त्याने प्रियाला पाहिले होते. त्यानंतर तो त्याच्या कुटुंबियांना प्रिया बापट काकूला भेटायचे असे म्हणाला होता. आता त्याची ही इच्छा पूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मुलाचे नाव शिवबा असे आहे.

झी ५ने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवबा त्याच्या आई-वडिलांबरोबर जर तरची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगाला आल्याचे दिसत आहे. त्यानंतर नाटकाचे काही क्षण पाहायला मिळतात. तिथे तो त्याच्या आई-वडिलांबरोबर बसून नाटक पाहत असल्याचे दिसत आहेत. प्रयोगानंतर तो प्रिया व इतर टीमला भेटतो.

जेव्हा तो प्रियाला प्रत्यक्षात पाहतो. तेव्हा तो गोड हसतो, तसेच तो डोक्यावर हात मारत असल्याचे दिसत आहे. प्रिया त्याला विचारते.तुला मला काकू म्हणायला कोणी शिकवलं? त्यानंतर प्रिया त्याच्याबरोबर बोलताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत झी ५ ने, “ही भेट त्याला कायम लक्षात राहणार आहे”, असे लिहिले आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत कौतुक केले आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालावलकरने लिहिले, “त्याची रिअॅक्शन भारी आहे. त्याने डोक्यावर हात मारला.” तर शिवबाच्या वडिलांनी कमेंट करत लिहिले, “आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांपैकी एक क्षण आहे. शिवबाला आयुष्यभर पुरेल हा अनुभव. झी ५ आणि प्रिया बापट तुमचे खूप आभार”, एका नेटकऱ्याने लिहिले, “किती गोड, भेट झाल्यानंतर त्याला किती छान वाटत आहे.”

प्रिया बापटनेदेखील तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते की आज बालगंधर्वला जर तरची गोष्टचा प्रयोग आहे. मला भेटायला कोणीतरी आलं आहे. त्यानंतर तो लहान मुलगा तिथे उभा राहिलेला दिसतो. प्रिया त्याला उद्देशून स्टार ऑफ द इयर असे म्हणते. ती त्याला म्हणते की प्रिया बापट काकू भेटल्या तुला. त्यानंतर सगळेजण हसताना दिसतात.

दरम्यान, प्रिया व उमेश अभिनयाबरोबरच आता निर्माते म्हणूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांची निर्मिती असलेले आमच्या पिढीची गोष्टच वेगळी हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.