Priya Bapat On Girija Oak: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. चाहत्यांपासून ते कलाकारांपर्यंत अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षावर केल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
आता अभिनेत्री प्रिया बापटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत यावर वक्तव्य केले आहे. अभिनेत्रीने नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियाने शेअर केलेल्या पोस्टवर एका नेटकऱ्याने काय कमेंट केली होती हे सांगितले.
ती म्हणाली, “मी सोशल मीडियावर असंभवबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. गुलाबी रंगाची साडी नेसलेले फोटो आणि गाणं टाकलं आहे. त्यावर एकाने कमेंट केली आहे की, गिरिजा ओक गोडबोले १०० मतांनी आघाडीवर, त्यावर मी त्याला रिप्लाय केला आहे की ती माझीसुद्धा आवडती आहे, माझी तिच्याशी काही स्पर्धा नाही.
“माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम…”
गिरिजा ओकबद्दल प्रिया पुढे म्हणाली, “माझं तिच्यावर खरंच खूप प्रेम आहे. कोणत्याही कारणाने जर लोक तिच्या प्रयत्नांना आज दाद देत असतील, मला खूप आनंद आहे. एका व्हिडीओमुळे का होईना, आज लोक तिला देशपातळीवर ओळखत असतील, तर खूप आनंद आहे. महत्त्वाचं म्हणजे ती माझी मैत्रीण आहे म्हणून नाही, तर मला असं वाटतं की ती एक उत्तम टॅलेंट असणारी अभिनेत्री आहे आणि ती एक उत्तम माणूस आहे. जर तिला लोक ओळखत असतील तर हे खूप चांगले आहे.
प्रियाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. डोळ्यांवर गॉगल आहे, गळ्यात मोत्यांची माळ घातल्याचे दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये तिने खांद्यावर शाल घेतल्याचे दिसत आहे. या फोटोंवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. अनेकांनी कमेंट्स करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी ती खूप सुंदर दिसत असल्याचे म्हटले आहे.
प्रियाने उल्लेख केलेली कमेंट अशी आहे की, …तरी पण गिरिजा ओक गोडबोले १०० मतांनी आघाडीवर आहे. त्यावर प्रियाने लिहिले की ती माझीसुद्धा आवडती आहे, कायम. असे म्हणत तिने गिरिजालादेखील टॅग केले आहे.
दरम्यान, प्रिया बापट लवकरच असंभव या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर मुक्ता बर्वे आणि सचित पाटीलदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
