Priya Bapat on Bonding With Parents: अभिनेत्री प्रिया बापट सध्या तिच्या नाटकामुळे चर्चेत आहे. सध्या तिचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे. या नाटकाला प्रेक्षक गर्दी करत आहे. प्रिया व तिच्या टीमकडून वेळोवेळी व्हिडीओ, फोटो शेअर करून हाऊसफुलची पाटी लागल्याचे सांगितले जाते. ते आनंद व्यक्त करतात आणि प्रेक्षकांप्रति कृतज्ञताही व्यक्त करतात. हे कलाकार या नाटकासाठी महाराष्ट्रभर दौरे करतात.
मराठी नाटक, सिनेमा यांबरोबरच प्रिया बापटने हिंदी सिनेमे, वेब सीरिज यांमध्येही काम केले आहे. अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे. आजपर्यंत तिने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याबरोबरच सोशल मीडियावरील पोस्ट, विविध मुलाखती यांमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. काही दिवसांपूर्वी तिने फिल्मफेअरला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने केलेली वक्तव्ये चर्चेत आली आहेत.
उमेशबरोबरच्या लग्नावेळी आईने काय सांगितलेले?
फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिचे करिअर, आई-वडिलांचा पाठिंबा आणि सिनेसृष्टी यांबद्दल वक्तव्य केले. आई-वडिलांबरोबरच्या नात्याबद्दल ती म्हणाली, “माझे लग्न होण्याच्या एक दिवस आधी माझी आई माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की, मला माहीत आहे की, लव्ह मॅरेज आहे. उमेश तुझ्याहून आठ वर्षांनी मोठा आहे. तुम्ही दोघे एकाच क्षेत्रात काम करता. पण, तुला कधी काही अडचण आली, तर तू सरळ माझ्याकडे ये. तू तुझ्या आयुष्याबरोबर काहीही चुकीचे करायचे नाहीस.” प्रिया असेही म्हणाली की माझ्या व माझ्या आई-वडिलांच्या नात्यात खुलेपणा होता. ती असेही म्हणाली की मला मूल हवे आहे की नको आहे, याबद्दलही मी माझ्या पालकांशी खुलेपणाने बोलले आहे.
सिटी ऑफ ड्रीम्समधील किसिंग सीनबद्दल वडिलांची काय प्रतिक्रिया होती?
सिटी ऑफ ड्रीम्समधील किसिंग सीनबद्दल वडिलांची काय प्रतिक्रिया होती, याबद्दलही तिने सांगितले. ती म्हणाली, “सिटी ऑफ ड्रीम्स’मधील तो सीन व्हायरल झाला होता. त्यावेळी मी माझ्या वडिलांबरोबर बोलले होते. मी माझ्या वडिलांना फोन केला व सांगितला आणि त्यांना म्हणालेले की, तुमच्याकडेही फोन आहे, युट्यूब आहे. कधी स्क्रोल करताना तुम्हाला तो व्हिडीओ दिसला, तर तो सीन नेमका काय आहे, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. त्यावर ते म्हणालेले की, हा तुझ्या कामाचा भाग आहे आणि तू ती भूमिका साकारली आहेस. लोक ट्रोल करतील, जग हे असेच असते आणि ते स्वीकारण्याची गरज आहे. कोणी ट्रोल केले म्हणून काळजी करण्याची गरज नाही.”
प्रिया म्हणाली, “ते ८४ वर्षांचे आहेत.आमच्या वयात एका पीढीचे अंतर आहे. कारण, जेव्हा त्यांचे लग्न झाले, तेव्हा ४४ वर्षांचे होते.तर माझी आई ३४ वर्षांची होती. त्यामुळे त्यांच्यात आणि आमच्यात ३० ते ४० वर्षांचा फरक आहे. पण, त्यांनी हे अंतर कधी जाणवू दिलं नाही”, असे म्हणत प्रियाने आई-वडिलांनी वेळोवेळी साथ दिल्याचे सांगितले.
