Priya Bapat and Umesh Kamat : प्रिया बापट व उमेश कामत यांच्याकडे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. लग्नाआधी जवळपास ८ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये प्रिया-उमेशने लग्नगाठ बांधली. गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही त्यांच्या ‘हे काय नवीन?’ या सीरिजमुळे चर्चेत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रियाने त्यांच्या नात्याबद्दलचा एक गोड किस्सा सांगितला आहे.

प्रिया अनेकदा उमेशला दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचे पापाराझींनी कॅप्चर केलेले व्हिडीओ शेअर करत असते. यामागे नेमकं काय कारण आहे याबद्दलचा खुलासा प्रियाने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

…म्हणून प्रिया उमेशला दीपिका-रणवीरचे व्हिडीओ पाठवते

प्रिया म्हणते, “काही जणांना आयुष्यातील प्रत्येक गोष्ट खूप अफेक्ट होते….आयुष्यातील प्रत्येक गोष्ट तुम्ही गांभीर्याने घेता. खरंतर, असाच स्वभाव माझा सुद्धा आहे. माझ्यामध्ये आणि उमेशमध्ये याबाबत अनेकदा चर्चा सुद्धा झालीये. मी त्याला विचारते सुद्धा… ‘तू रस्त्याने चालताना माझा हात का नाही पकडत?’ इतकंच नव्हे तर मी त्याला दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहचे व्हिडीओ वगैरे सुद्धा पाठवते.”

Award Banner

प्रिया पुढे म्हणाली, “दीपिका आणि रणवीर कोणत्याही इव्हेंटमध्ये बघ कसे असतात, तुला काय होतं? असं बरंच काय-काय मी त्याला सांगत असते. पण, उमेशचा स्वभाव फार वेगळा आहे. तो असं कधीच करत नाही आणि त्याला यामध्ये काही अपूर्ण आहे असं वाटत नाही. पण, माझ्यासाठी गोष्टी वेगळ्या आहेत. एकंदर काय तर प्रत्येकाचा स्वभाव आणि प्रेम व्यक्त करण्याची भावना वेगळी असते.”

“जेव्हा प्रेम, लग्न नवीन असतं तेव्हा साहजिकच हे हात वगैरे पकडणं या गोष्टी घडतात. पण, जेव्हा तुम्हाला एकमेकांची सवय होते…तेव्हा तुम्ही एकमेकांना गृहित धरायला लागता.”

“मला जेव्हा खूप त्रास होत असेल आणि मी खूप जास्त चिडले असेन तर मला मनापासून असं वाटतं की, उमेशने मला जवळ घ्यावं आणि समजून सांगावं. मी त्याला तोंडावर म्हणत असते की, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये वगैरे…पण, त्या क्षणाला माझी अपेक्षा अशी असते की त्याने मला जवळ घ्यावं.” अशा भावना प्रियाने व्यक्त केल्या.