Priya Bapat and Umesh Kamat Dance Video: प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडी आहे. या जोडीने आतापर्यंत विविध मालिका, चित्रपट, नाटक आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

आता प्रिया-उमेश यांनी एक जबरदस्त डान्स केला. विशेष म्हणजे त्यांच्याबरोबर आणखी एक कलाकार जोडपे आहे. ही दुसरी जोडी म्हणजे सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे आहेत.

सखीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सखी ही प्रिया, उमेश आणि सुव्रत यांच्यासह डान्स करताना दिसत आहे. त्यांनी पनवाडी या गाण्यावर ठेका धरला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांची ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळत आहे.

चौघेही डान्स करताना मजा करत असल्याचे दिसत आहे. शेवटी ते एकत्र एकमेकांना मिठी मारतात. या व्हिडीओवर सखीने नाटक मंडळी तुम्हाला त्यांच्या कला कोठडीमध्ये आमंत्रित करत आहे, असे लिहिले आहे.

तसेच हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिले, “‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचे ३०० प्रयोग पूर्ण झाले आहेत आणि ‘वर वरचे वधू वर’ नाटकाचे २०० प्रयोग लवकरच पूर्ण होतील.”

पुढे तिने प्रेक्षकांचे आभार मानत लिहिले, “आमच्यावर इतके प्रेम दाखविल्याबद्दल तुम्हा प्रेक्षकांचे खूप आभार. आपल्याला असे अनेक प्रयोग करायचे आहेत”, असे म्हणत तिच्या भावना व्यक्त केल्या. या व्हिडीओमध्ये तिने सुव्रत आणि प्रियालादेखील टॅग केले आहे.

नेटकऱ्यांनी केले कौतुक

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. अनेकांनी तुम्ही चौघेही खूप छान कलाकार आहात असे लिहिले आहे; तर काहींनी दोन्ही नाटकं पाहिली असून दोन्हीही सुंदर नाटके आहेत असे लिहिले आहे. तर काहींनी सुव्रतचा डान्स पाहिल्यानंतर त्याची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील सुजय ही भूमिका आवडल्याचे लिहिले आहे.


प्रिया आणि उमेश हे ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. नुकतेच या नाटकाचे ३०० प्रयोग पूर्ण झालेत. या नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो. कलाकार वेळोवेळी याबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. प्रिया आणि उमेश यांच्याबरोबरच या नाटकात पल्लवी पाटील आणि आशुतोष गोखले हे कलाकारदेखील आहेत.

सखी आणि सुव्रत ‘वर वरचे वधू वर’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या नाटकालादेखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या कलाकारांनी झी मराठी वाहिनीच्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात एकत्रित हजेरी लावली होती. त्यांच्याबरोबर अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णीदेखील दिसले होते.