Priya Bapat and Umesh Kamat shares photos of Maldives Trip: मालिका, चित्रपट, नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे कलाकार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच त्यांच्या खासगी आयुष्याची झलकही पाहायला मिळते.
प्रिया बापट व उमेश कामत हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडपे आहे. ते त्यांच्या विविध भूमिकांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. चित्रपट, नाटक, वेब सीरिज या माध्यमातून ते चाहत्यांच्या भेटीला येत असतात. त्यांचे ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक सध्या चांगलेच गाजत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नाटकाच्या प्रयोगासाठी दौरे करत असल्याचे पाहायला मिळते.
याबरोबरच त्यांची निर्मिती असलेले ‘आमच्या पिढीची गोष्ट वेगळी’ या नाटकालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या सगळ्यात प्रिया व उमेशने सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडीओ शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काही दिवसांपासून ते सुट्ट्यांसाठी मालदीवला गेल्याचे त्यांनी शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटो आणि विविध व्हिडीओंमधून समजत होते. आता पोस्ट शेअर करत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रिया बापट व उमेश कामतने घेतला मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद
उमेशने काही व्हिडीओ व फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांचा विमानातील प्रवास, त्यांचे राहण्याचे ठिकाण, समुद्र, स्कुबा डायव्हिंग, सूर्यास्त, समुद्रातील जैवविविधता, जेवण, प्रियाबरोबरचे सुंदर फोटो अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले, “कामाच्या ट्रिप्स खूप झाल्या, ही ट्रिप फक्त आमच्यासाठी होती.”
उमेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. “तुम्हा दोघांच्या आयुष्यात असेच आनंदी क्षण यावेत, या माझ्या शुभेच्छा आहेत”, “तुमची जोडी अशीच आयुष्यभर राहू दे. तुमची जोडी दृष्ट लागण्यासारखी आहे”, “मस्त”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
प्रिया बापट म्हणाली…
उमेशबरोबरच प्रियाने एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाने मालदीवच्या ट्रिपमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की मालदीव, तू खूप सुंदर आहेस. मी आयुष्यभर डोंगरांवर प्रेम केले आहे. मला कधी समुद्राची ओढ वाटली नाही. पण, या ट्रिपने मला बदलले आहे. आता मी समुद्राच्या प्रेमात पडली आहे. त्याची शांतता, त्याचा रौद्रपणा पाहिल्यानंतर मी त्याच्याशी खूप जोडली गेली आहे असं वाटतं आहे. वरून आनंदी, उत्साही… पण आतून खूप शांत आहे. समुद्राने स्वत:मध्ये कितीतरी रहस्ये आणि खजिना जपून ठेवला आहे. कधी कधी आपल्याला फक्त त्याच्या लाटा आणि वाऱ्यांचा गोंधळ दिसतो, पण जेव्हा आपण त्याच्या खोलात जातो, तेव्हा कळतं की तो आतून किती सुंदर आहे आणि त्याच्या मनात किती गोष्टी दडल्या आहेत, असे लिहित तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रिया व उमेश आगामी काळात कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
