दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नुकताच तो ‘बॉईज ४’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लक्ष्मीकांत यांचं निधन झाल्यावर प्रिया बेर्डे यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला. अभिनयने सिनेविश्वात पदार्पण केल्यापासून त्याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रिया बेर्डे आवर्जून दखल घेतात. अलीकडेच लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी अभिनयबरोबर घडलेला एक प्रसंग सांगितला.

प्रिया बेर्डे म्हणाल्या, “अभिनय आणि स्वानंदी यांनी सिनेविश्वात काम करावं यासाठी मी काहीच प्रयत्न केले नाहीत. अभिनयने स्वत: खूप मेहनत घेतली. त्यामुळे याला आपण घराणेशाही बोलू शकत नाही. माझी मुलं फार कष्टाने मोठी होत आहेत आणि त्यांनाही इंडस्ट्रीत चांगले-वाईट अनुभव आलेत. आता ते अनुभव लक्षात घेऊन त्यांचा प्रवास सुरू आहे.”

हेही वाचा : Video : “बाबा सलग ३३ वर्ष…”, मुग्धा वैशंपायनचे वडील झाले सेवानिवृत्त! गायिकेने शेअर केले भावनिक क्षण

अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “अभिनय-स्वानंदीला या इंडस्ट्रीत खूप चांगले आणि अत्यंत वाईट असे दोन्ही अनुभव आले आहेत. एका समारंभात माझ्या अभिनयला ‘तू माझ्या पाया पडला नाहीस’ असं बोलण्यात आलं होतं. त्यानंतर त्या व्यक्तीने अभिनयला सर्वांसमोर शिव्या घातल्या. तेव्हा अभिनयला खूप त्रास झाला…तो रडायला लागला आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेला. तेव्हा नेमकी मी अभिनयला भेटायला गेले. त्याच्याकडे काय झालं याबद्दल मी चौकशी केली.”

हेही वाचा : “स्त्रियांचे डोळे वाचता आले पाहिजेत”, ‘झिम्मा २’च्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “एक पुरुष म्हणून…”

“अभिनयने मला घडलेला प्रसंग सांगितला. याशिवाय त्या दिग्दर्शकाने पुढची पाच वर्ष तुला माझ्या चित्रपटात घेणार नाही असंही सांगितलं होतं. तेव्हा मी अभिनयला म्हणाले, मी खरंच काहीतरी चांगलं काम केलं असेल…तर ती व्यक्ती पुढची पाच वर्ष इंडस्ट्रीत असेल की नाही हे आपण नक्की बघूया. अर्थात तसंच झालं तो मनुष्य आता फार मोठा नाहीये. कार्यक्रम झाल्यावर पाया पडायला लावणं ही गोष्ट मला पटली नव्हती. सेटवर सुद्धा एका व्यक्तीने अभिनयला चुकीची वागणूक दिली होती. हडतूड करणं, वाईट वागणूक देऊन नंतर लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा म्हणून टिआरपी आणायचा असे असंख्य अनुभव आम्हाला आले आहेत. आम्ही पण खूप गोष्टी सहन करतो…सगळंच सांगता येत नाही पण, मी नेहमीच माझ्या मुलांबरोबर आहे.” असं प्रिया बेर्डे यांनी सांगितलं.

Story img Loader