Priyadarshini Indalkar on Chhaya Kadam: अभिनेत्री छाया कदम आणि प्रियदर्शिनी इंदलकर नुकत्याच ‘बंडखोर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. आता प्रियदर्शिनीने सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर करीत छाया कदम यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
तिने छाया कदम यांच्याबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो ‘बंडखोर’ सिनेमातल्या एका सीनमधील असल्याचे दिसत आहे. या फोटोत छाया कदम यांना मिठी मारताना ती भावूक झाल्याचे पाहायला मिळते.
“मला आजही आपला पहिला संवाद…”
छाया कदम यांच्याबरोबरचे फोटो शेअर करीत प्रियदर्शिनीने लिहिले, “मी अशी छायाताईच्या मिठीत विरघळते.” पुढे तिने छाया कदम यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग करीत लिहिले, “मला आजही आपला पहिला संवाद आठवतो. तू कमाल आहेस गं. तुझ्यासारखी सीनियर अभिनेत्री एका मैत्रिणीप्रमाणे बरोबर असणं ही खूप मोठी गोष्ट आहे.”
तिने पुढे असेही लिहिले, “माझं कौतुक करण्यासाठी, मी योग्य मार्ग निवडतेय याची खात्री करून घेण्यासाठी थँक्यू.” प्रियदर्शिनीच्या या पोस्टवर छाया कदम यांनी कमेंट करीत लिहिले, “तुझ्या या मिठीने मी खूप श्रीमंत झाले. यापुढे जसजसे तू एकेक मोठमोठे प्रोजेक्ट करशील, तसतशी माझ्या श्रीमंतीत वाढ होत जाईल. लव्ह यू”, असे लिहीत प्रेम व्यक्त केले. तर, तितिक्षा तावडेने हार्ट इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले.
अनेक चाहत्यांनीही कमेंट्स करीत त्यांनी सिनेमात आजी व नातीचे साकारलेल्या पात्रांचे कौतुक केले आहे. दरम्यान, महेश मांजरेकर दिग्दर्शित बंडखोर हा सिनेमा २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सध्या कौतुक होताना दिसत आहे. छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, तितिक्षा तावडे हे आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.
