Priyadarshini Indalkar Mahesh Manjrekar Bandkhor Movie Post: ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘बंडखोर’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता प्रियदर्शिनीने महेश मांजरेकर यांच्यासाठी सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहिली आहे.
प्रियदर्शिनी इंदलकरने ‘बंडखोर’ चित्रपटातील कलाकारांबरोबरचा खास फोटो शेअर करीत त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यापूर्वी तिने अभिनेत्री छाया कदमबरोबर खास फोटो शेअर केले होते. त्यानंतर आता प्रियदर्शिनीने महेश मांजेरकर यांच्या सिनेमामध्ये काम करण्याचा अनुभव आणि त्यांनी दिलेली प्रेरणा यांसाठी त्यांचे आभार मानले आहेत.
काय आहे प्रियदर्शिनी इंदलकरची पोस्ट?
प्रियदर्शिनी इंदलकरने इन्स्टाग्रामवर महेश मांजरेकर यांच्याबरोबर ‘बंडखोर’च्या सेटवरचे शूटिंगचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यासह तिने लिहिले, ” ‘दशावतार’च्या निमित्ताने तुमच्याबरोबरचा एक छोटासा सीन वाट्याला आला, तेव्हा वाटलं नव्हतं की, तुमच्या दिग्दर्शनाखाली काम करण्याची संधी इतक्या लवकर मिळेल.”
पुढे तिने लिहिले, “माझ्यातील ‘मीरा’ला ओळखल्याबद्दल आणि माझ्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन, ती भूमिका साकारण्यासाठी मला प्रोत्साहन दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्हाला निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, तसेच या क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक नवोदित कलाकाराला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळो, अशीच माझी इच्छा आहे.”
प्रियदर्शिनी इंदलकरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत तिचे कौतुक केले. एका नेटकऱ्याने लिहिले, ‘सध्या पोरगी एकदम फॉर्ममध्ये आहे.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, ‘खूप सुंदर.’ आणखी एका नेटकऱ्याने ‘ग्रेट’ असे लिहिले असून, अनेकांनी तिच्या या पोस्टवर रेड हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘बंडखोर’ हा चित्रपट २४ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये छाया कदम, मृणाल कुलकर्णी, प्रियदर्शिनी इंदलकर, नित्यश्री ज्ञानलक्ष्मी, तितिक्षा तावडे हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत. ‘बंडखोर’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
