Priyadarshini Indalkar Sister Madhumati Raksha Bandhan Video: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम ओळखला जातो. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून घराघरांत ओळख निर्माण केलेली अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने रक्षाबंधन साजरे केले आहे. प्रियदर्शनीने बहीण मधुमती हिच्याबरोबर रक्षाबंधन साजरे केले.
सर्वत्र रक्षाबंधन सणाचा उत्साह असून कलाकारांनी त्यांचे रक्षाबंधन साजरे केले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रियदर्शिनीने तिची बहीण मधुमतीबरोबर रक्षाबंधन साजरे केले. मधुमतीने अत्यंत प्रेमाने व मायेने प्रियदर्शिनीला राखी बांधल्याचे दिसून आले. इन्स्टाग्रामवर प्रियदर्शिनीने व्हिडीओ शेअर केला असून, या दोन्ही बहिणींमधील प्रेमाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले.
प्रियदर्शिनीने दिला मधुमतीला आधार
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये प्रियदर्शिनीने सुंदर पारपंरिक साडी नेसली असून, ऑक्सिडाईज कर्णफुलांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. यावेळी रक्षाबंधनानिमित्त तिला तिची बहीण मधुमतीने ओवाळले आणि राखी बांधली. मधुमती प्रियदर्शिनीला ओवाळत असताना तिने मधुमतीचा हात धरला होता. तिला आधार देतानाचा प्रियदर्शिनीचा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी कमेंट्स करीत प्रियदर्शनीचे कौतुक केले. तसेच मधुमतीला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रियदर्शिनी व मधुमतीच्या या रक्षाबंधनाच्या खास व्हिडीओवर अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि डान्सर आशीष पाटीलने रेड हार्ट कमेंट्स करीत प्रेम व्यक्त केले. तर अभिनेता सिद्धार्थ मेननने व निर्माती मेघना जाधव यांनी ‘अतिशय गोड, देव तुमच्या दोघींचं भलं करो,’ अशा कमेंट्स केल्या आहेत. त्याचबरोबर एका नेटकऱ्यानं लिहिलं, “ताई तू एका मोठ्या भावाप्रमाणे कर्तव्य पार पाडतेयस, ज्या पद्धतीनं तिला सांभाळतेस, त्याबद्दल खरंच सलाम तुला.” दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “तु्मच्या दोघींमधील प्रेम खूपच खास आहे. ज्या प्रकारे तुम्ही तिला आपुलकीनं जवळ घेता, तिची काळजी घेता आणि तिचा आनंद साजरा करता, त्यावरून तुमच्यामध्ये किती सुंदर नातं आहे, हे दिसून येतं.”
मधुमती ही प्रियदर्शिनीची चुलतबहीण असून, तिला डाऊन सिंड्रोम आहे. विशेष म्हणजे मधुमती स्पेशल ऑलिम्पिकमध्ये खेळली आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्यपदकही मिळवले आहे. विशेष ऑलिम्पिकमध्ये Bocce या खेळात मधुमतीला रौप्यपदक मिळाले आहे. अनेक इव्हेंटमध्ये प्रियदर्शिनी ही तिची बहीण मधुमतीसह सहभागी झाल्याचे दिसून येते.
दरम्यान, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘मधून ओळख निर्माण करणाऱ्या प्रियदर्शिनीने सिनेमांमध्येही प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. ‘चिकन मसाला’, ‘फुलराणी’ आणि ‘फक्त महिलांसाठी’ यांसारख्या चित्रपटांमधून ती वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली आहे. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रियदर्शिनीचा प्रवास सातत्याने चर्चेत राहिला आहे.
