Priyanka Barve & Sarang Kulkarni : मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय गायिका प्रियांका बर्वे आणि संगीतकार सारंग कुलकर्णी यांच्या लग्नाला नुकतीच ११ वर्षे पूर्ण झाली. २००७ मध्ये या दोघांची पहिली भेट सवाई गंधर्व महोत्सवात झाली होती. पुढे, दोघांची छान मैत्री झाली आणि कालांतराने त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सारंगला प्रियांका पाहता क्षणीच आवडली होती.

पण, तुम्हाला माहितीये का? प्रियांका आणि सारंग यांच्या लग्नाला आता ११ वर्षे पूर्ण झालीयेत तरीही त्यांच्या लग्नाच्या फोटोंचा अल्बम अजूनही बनवण्यात आलेला नाहीये. यामागचं कारण गायिकेने ‘अनुरुप विवाहसंस्था’ याच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

प्रियांका म्हणाली, “सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आमच्या लग्नातील फोटोंचा अल्बम आजतागायत नाहीये. ही एकमेव जबाबदारी सारंगवर होती…पण, आज आमच्या लग्नाला ११ वर्षे झालीयेत तरीही मी आमच्या लग्नाचे फोटो आजवर पाहिलेले नाहीयेत. त्यामुळेच लग्नातील सगळ्या आठवणी आमच्या लक्षात आहेत… केव्हा-केव्हा काय झालं होतं, लग्नात सगळ्या मित्रमंडळींनी कशी धमाल केली सगळं आम्हाला व्यवस्थित आठवतंय. खरंतर, सारंगचे जे काका आहेत त्यांनीच आमचे फोटो काढले होते. त्यातून आम्हाला फोटो सिलेक्ट करून सांगायचे होते…आणि लग्नाचा अल्बम बनवून घ्यायचा होता.”

“कारण, आई-बाबांनी सांगितलं होतं…आता लग्न आम्ही लावून दिलंय. हे फोटोंचा अल्बम वगैरे तुम्ही बघा. तो अल्बम बनवणं आजपर्यंत राहून गेलंय. मी सुद्धा वाट बघतेय की, सारंग कुठल्यातरी लग्नाच्या वाढदिवसाला तो अल्बम मला देईल. मी त्याच्या एवढी मागे लागली होती…की मी स्वत: कॉम्प्युटरवर सगळे फोटो सिलेक्ट केले होते ते फोटोज पेनड्राइव्हमध्ये घेतले. आता सारंगला फक्त पेनड्राइव्ह काकांना नेऊन द्यायचा होता. पण, ही गोष्ट सारंगला या ११ वर्षात जमलेली नाहीये. त्यामुळे अजूनही आमच्याकडे लग्नाचा अल्बम नाहीये. साखरपुड्याचे फोटो आहेत पण, लग्नातील फोटो नाहीयेत.” असं प्रियांकाने सांगितलं.

यावर, आता लवकरच मी लग्नाच्या फोटोंचा अल्बम बनवून घेईन आणि फोटो शेअर करेन असं सारंगने सांगितलं. दरम्यान, प्रियांका आणि सारंग या दोघांनाही घरातूनच संगीताचा वारसा लाभला आहे. संगीताबद्दल असलेल्या ओढीनेच त्यांची भेट झाली. जानेवारीमध्येच या दोघांनी त्यांच्या लग्नाला ११वा वाढदिवस साजरा केला.