Punha Shivajiraje Bhosale Movie Collection Day 2 Updates : मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा सिनेमा ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाला गेल्या दोन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत किती कोटींचा गल्ला जमावला जाणून घेऊयात…
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. याशिवाय बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या भूमिकांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळे ट्रेलर प्रदर्शित झाल्यावरच ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज प्रेक्षकांनी बांधला होता.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमाने प्रदर्शित झाल्यावर पहिल्या दिवशी १९ लाखांचा गल्ला जमावला. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ नोव्हेंबरला शनिवारी या चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महेश मांजरेकरांच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३४ लाखांची कमाई केली आहे. यामुळे सिनेमाचं दोन दिवसांचं एकूण कलेक्शन ५३ लाखांपर्यंत पोहोचलं आहे, अशी माहिती सॅकनिल्कवरून देण्यात आली आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमातं कलेक्शन
पहिला दिवस – १९ लाख
दुसरा दिवस – ३४ लाख
एकूण कलेक्शन – ५३ लाख
या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून त्याच्या सोबतीला विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे.
“माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे आजच्या समाजाशी भिडण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांनी केवळ स्वराज्य उभं राहिलं नाही, तर एक जनमानस जागृत झाले. आजच्या पिढीपुढे असलेल्या प्रश्नांकडे पाहताना, त्याच विचारांचा प्रकाश पडद्यावर आणायचा आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा प्रवास इतिहास सांगणारा असेलच, त्याचबरोबर वर्तमानाला प्रश्न विचारणारा, त्याला जागवणारा आणि दिशा दाखवणारा ठरेल.” असं मत सिनेमाबद्दल महेश मांजरेकरांनी व्यक्त केलं होतं. आता येत्या काही दिवसांत या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकूण किती कोटींची कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
