Punha Shivajiraje Bhosale Movie Teaser : २००९ मध्ये ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर भरभरून यश मिळालं होतं. यानंतर जवळपास १६ वर्षांनी महेश मांजरेकरांनी यंदाच्या महाराष्ट्र दिनी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची घोषणा केली.
या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका अभिनेता सिद्धार्थ बोडके साकारणार आहे. तसेच चित्रपटात त्याच्यासोबत बालकलाकार त्रिशा ठोसरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे; ती यापूर्वी ‘नाळ २’मध्ये झळकली होती.
महेश मांजरेकर यांनी आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेत, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. या भव्य चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केलं असून, निर्मितीची धुरा राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. बहुप्रतीक्षित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याची घोषणा आषाढी एकादशीच्या निमित्ताने करण्यात आली आहे.
टीझरमध्ये ऐकू येणारे ‘राजे… राजे’ हे बोल ज्या ऊर्जेने, ज्या भावनांनी भरलेले आहेत, ते थेट काळजाला भिडतात. सिद्धार्थ बोडकेच्या संवादांमधून केवळ इतिहासाची आठवण होत नाही, तर मनात नवी उमेद, ऊर्जा आणि प्रेरणा संचारते. शिवरायांच्या झंझावाती व्यक्तिमत्त्वाचं आणि त्यागमय नेतृत्वाचं दर्शन घडवणाऱ्या या टीझरमधील दृश्यं आणि संवाद हे अंगावर शहारे आणणारे आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून केवळ ऐतिहासिक पुनरावलोकन न होता, आधुनिक काळातील समाजाला भिडणारा विचारप्रवाह पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
“लाज वाटली पाहिजे तुम्हाला, महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. त्यांची लेकरं पोरकी होताहेत… स्वराज्याचं लखलखतं नाणं होता माझा बळीराजा पण तुम्ही त्याला देशोधडीला लावून महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासलाय पण आता बास! जेव्हा जेव्हा महाराष्ट्राला गरज पडणार तेव्हा तेव्हा मी येणार” असं सिनेमाच्या टीझरमध्ये सांगितलं जात आहे.
चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या सिनेमात सिद्धार्थ बोडके, सयाजी शिंदे, त्रिशा ठोसर, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, विजय निकम, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, नित्यश्री, सांची भोयर, पायल जाधव, नयन जाधव हे कलाकार झळकणार आहेत.
याविषयी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणतात, “शिवाजी महाराज ही केवळ ऐतिहासिक व्यक्तिरेखा नसून ते एक विचार आहेत. हा विचार आज अधिक आवश्यक आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट म्हणजे इतिहासाकडे मागे वळून पाहणं नाही, तर शिवरायांच्या विचारांच्या प्रकाशात आजचा अंधार उजळवण्याचा प्रयत्न आहे. समाजात निर्माण झालेल्या निराशा, उदासीनता, आणि दिशाहीनतेच्या गर्तेत आपण पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या मूल्यांकडे वळणं गरजेचं आहे. हा सिनेमा त्या जाणिवेचा आवाज आहे.”