Pushkar Jog on Marathi actors respect in Mumbai: पुष्कर जोग नुकताच ‘ह्युमन कोकाईन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पुष्कर जोगने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. सध्या तो फक्त अभिनेता म्हणूनच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम करतो.

पुष्कर जोग अभिनयाबरोबरच त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेदेखील चर्चेत असतो. तसेच, त्याची वक्तव्येदेखील लक्ष वेधून घेतात. त्याच्या स्पष्टवक्तेपणाची वेळोवेळी चर्चा होताना दिसते.

“आज मोठमोठ्या बॉलीवूडच्या कार्यक्रमांना मराठी कलाकारांना बोलवत नाहीत”

आता पुष्करने नुकतीच मॅक्स महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मराठी कलाकारांना आदर मिळत नाही, असे वक्तव्य पुष्कर जोगने केले. तो म्हणाला, “मुंबईत आज आपलं अस्तित्व काय आहे? आज मोठमोठ्या बॉलीवूडच्या कार्यक्रमांना मराठी कलाकारांना बोलवत नाहीत, मागे बसवतात. ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ सगळ्या हिंदी माणसांना मिळाले आहेत, हे असं का होतं?”

“उपेंद्र दादा, सुबोध दादा यांनी नायक म्हणून हिंदी चित्रपट केले. मग त्यांना का पुरस्कार मिळत नाही. हिरो म्हणून मीही हिंदी चित्रपट केला. ‘गांधी टॉक्स’ हा सिनेमा नुकताच आला होता. त्याचा दिग्दर्शक मराठी आहे. चिन्मय दादाचा ‘इन्स्पेक्टर झेंडे’ नेटफ्लिक्सवर आला होता. माझा साधा प्रश्न आहे की यांना का महाराष्ट्रीयन ऑफ द इअर मिळत नाही? बाहेरच्या हिंदी माणसांना तुम्ही हा पुरस्कार देता. माझं साहेबांसारखचं मत आहे की मुंबईत येऊन मराठी माणसाला माज दाखवायचा नाही. पण, यावर दुसरं कोणीच बोलत नाही, मी एकटाच बोलतो.”

तो असेही म्हणाला, “कसं वागायचं हे भोजपुरी कलाकार मुंबईत येऊन आपल्याला सांगणार का? मला भेदभाव करायचा नाही. माझ्या बिल्डिंगमध्ये एक भोजपुरी कलाकार राहतो. मी स्टार आहे असं ते वागताना दाखवतात. ही आपली मुंबई आहे, इथे आपण कसे वागलो पाहिजे. मी माज म्हणत नाही, पण तो स्टारडमचा आदर असतो; मराठी कलाकारांना तो आदर मिळत नाही. बाहेरची लोक येऊन माझ्यावर वर्चस्व गाजवणार असतील, तर मग मी आतापर्यंत काय काम केलं,” असे म्हणत पुष्कर जोगने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

पुष्कर जोग वेळोवेळी याबद्दल त्याचे मत व्यक्त करतो. त्याला अनेकदा ट्रोलिंगचादेखील सामना करावा लागतो. अभिनेता अनेकदा बिग बॉस मराठीतील स्पर्धकांच्या खेळावरही त्याचे मत मांडतो. एखाद्या स्पर्धकाच्या चुकीच्या वागण्यावरही तो कमेंट करत असतो.

‘मुसाफिरा’, ‘बापमाणूस’, ‘व्हिक्टोरिया एक रहस्य’, ‘हार्दिक शुभेच्छा’, ‘जबरदस्त’ अशा अनेक चित्रपटांसाठी तो ओळखला जातो. अभिनयाबरोबरच तो त्याच्या नृत्यासाठीदेखील लोकप्रिय आहे.

आता आगामी काळात अभिनेता कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.