महेश कोठारे यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘जबरदस्त’ हा चित्रपट. पुष्कर जोग, संजय नार्वेकर आणि मानसी नाईकची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शिवाय या चित्रपटातील गाणीही लोक अजून विसरलेले नाहीत. या चित्रपटात मुख्य अभिनेता पुष्कर जोगला एक जॅकेट मिळतं. ज्यात एक पॉवर असते आणि पॉवरच्या जॅकेटमुळे तो सहज कुठेही उडू शकतो असं दाखवण्यात आलं आहे.

शिवाय या चित्रपटात काही अ‍ॅक्शन सीन्सही आहेत आणि हे सीन शूट करताना पुष्कर जोगचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात पुष्करच्या हाताचा अंगठा तुटल्याचे त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे. लोकशाही फ्रेंडलीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुष्कर जोगने ‘जबरदस्त’ चित्रपटातील या प्रसंगाची आठवण सांगितली आणि त्याच्या अपघाताबद्दलही सांगितलं.

या अपघाताबद्दल पुष्कर जोग म्हणाला की, “या चित्रपटावेळी स्टंट शूट करताना माझा अंगठा तुटला होता. खूप लोकांना याबद्दल माहिती नाही. माझा अंगठा तुटलेला आहे आणि तो शस्त्रक्रियेने दुरुस्त केलेला आहे. या शस्त्रक्रियेनंतर माझा अंगठा पूर्ण बरा झलेला नाही. मला अजूनही माझा अंगठा वाकवता येत नाही. आम्ही मेट्रिक्स चित्रपटातील एक स्टंटसारखाच स्टंट या चित्रपटात करण्याचा प्रयत्न करत होतो.”

यापुढे पुष्करने सांगितलं की, “तेव्हा महेश कोठारे सर म्हणाले की, पुष्कर हा स्टंट करशील का? तेव्हा जोश होता, त्यामुळे जोशात मी म्हटलं की करतो. तुम्ही म्हणाल ते मी करेन. मग मी तो स्टंट केला आणि झाडावर फेकलो गेलो. तेव्हा केबल्स वगैरे लावलेल्या होत्या; पण तोंड आपटेल या भीतीने मी माझा हात मध्ये आणला. त्यामुळे माझा अंगठा तुटला. मला आठवतंय या अपघातामुळे दोन महीने शूटिंग रखडलं होतं.”

दरम्यान, पुष्कर जोग हा ‘जबरदस्त’, ‘वेल डन बेबी’, ‘अदृश्य’, ‘इट्स टू मच’, ‘ऐसी भी क्या जल्दी है’, ‘डोन्ट वरी बी हॅपी’, ‘बापमाणूस’, ‘मुसाफिरा’, ‘सून लाडकी सासरची’, ‘द एआय धर्मा स्टोरी’ अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुष्कर त्याच्या सोशल मीडियावरील रोखठोक व्यक्तव्यांसाठीही चांगलाच लोकप्रिय आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुष्करचा काही दिवसांपुर्वी ‘हार्दिक शुभेच्छा, पण त्यांचं काय?’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात पुष्करबरोबर हेमल इंगळे, विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर आणि किशोरी अंबिये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांत होते.