Rahul Deshpande and Neha Deshpande divorce: मराठी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व त्यांची पत्नी नेहा देशपांडे सप्टेंबर २०२४ मध्ये आम्ही कायदेशीररित्या वेगळे झाले. राहुल देशपांडेंनी सप्टेंबर २०२५ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटाची पोस्ट केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं. वैयक्तिक आयुष्यातील ही बाब जाहीरपणे सांगायची काय गरज होती? असे प्रश्नही विचारले जाऊ लागले. आता खुद्द राहुल देशपांडेंनी त्यांच्या घटस्फोटाबद्दल व सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा निर्णयाबद्दल भाष्य केलंय.
“मी एक कलाकार म्हणून व माणूस म्हणून अतिशय प्रामाणिक आहे. रेणुका मी व नेहा अशा खूप पोस्ट माझ्या अकाउंटवर दिसतील. मला वाटतं की ही माझी जबाबदारी आहे जी माणसं मला फॉलो करतात, जे माझे चाहते असतील तर त्यांना सांगायचं होतं की आता हा अध्याय संपलाय. एवढाच त्यामागचा हेतू होता. कारण पूर्वी आम्ही कुठे बाहेर गेलो, की आमचे फोटो असायचे. आज मी अमूक इकडे गेलो, तिकडे गेलो असं एक्झिबिशन लावायचो नाही, पण अगदी जेवढ्यास तेवढं ठेवलं होतं पण तशा बऱ्याच पोस्ट आहेत आणि त्या अजुनही आहेत. त्यामुळे आता आयुष्यातील हा अध्याय संपलाय तर त्याबद्दल लोकांना सांगायला पाहिजे असं मला वाटलं. त्यामागे दुसरा काहीच हेतू नव्हता,” असं राहुल देशपांडेंनी सांगितलं.
घटस्फोट काही मुद्दामहून होत नाही- राहुल देशपांडे
राहुल देशपांडे पुढे म्हणाले, “आमचे संबंध आताही खूप चांगले आहेत. आम्ही रेणुकाचे आई-वडील आहोत आणि कायम राहू. आताही मी रेणुकाची पोस्ट टाकली, त्यात नेहा होती. नेहाने पोस्ट टाकली, त्यात मी होतो. एखादा अध्याय संपल्यानंतर कशी तुझी चूक होती, कशी माझी चूक नव्हती असं सांगतो, पण आमच्यात तसं काहीच नव्हतं. घटस्फोट काही मुद्दामहून होत नाही, त्याला विविध कारणं असतात. त्यात तुमचीही चूक असते, तुम्हाला वाटतं समोरच्याचीही आहे, तर त्याचीही चूक असते. अशा गोष्टींना नेहमी दोन बाजू असतात. मला वाटतं की कारण नसताना आपण त्याचा खूप मोठा बाओ करतो.”
घटस्फोटासंदर्भात कोणाचेच फोन घेतले नाहीत – राहुल देशपांडे
“घटस्फोटाच्या घोषणेनंतर लोकांनी फोन केले, पण कोणाचेच फोन घेतले नाही. कारण ही माझी वैयक्तिक बाब आहे, मला त्याबद्दल कुणाशीच बोलायचं नव्हतं. फोन उचलून मी काय बोलणार? मी कसा बरोबर आहे, माझ्यावर कसा अन्याय झाला हे मी का सांगणार, कारण ते झालंच नाहीये,” असं राहुल देशपांडे म्हणाले.
नेहा व रेणुका दोघींनाही खूप त्रास झाला – राहुल देशपांडे
घटस्फोटाच्या घोषणेनंतर नेहा व रेणुका दोघींनाही खूप त्रास झाला, असं राहुल देशपांडेंनी सांगितलं. “ही वैयक्तिक गोष्ट आहे, पण ती कुणाच्याही बाबतीत घडू शकते. यामुळे दोन्ही व्यक्ती वाईट ठरत नाहीत किंवा कोणाची चूक आहे, याला अक्कल नाही, याचं कुठेतरी बाहेर लफडं असेल अशा गोष्टींना काही अंत नाही,” असं राहुल देशपांडेंनी नमूद केलं.
