काँग्रेस नेते राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मानहानीप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयाने गुरुवारी(२३ मार्च) राहुल गांधींना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. त्यानंतर आज(शुक्रवार, २४ मार्च) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. याप्रकरणावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच एका मराठी अभिनेत्याच्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. पंतप्रधान मोदी मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकरने ट्वीट केलं होतं. राहुल गांधींना शिक्षा सुनावल्याचं एएनआयचं ट्वीट आरोहने त्याच्या ट्वीटरवरुन रिट्वीट केलं होतं. "छान! मला खात्री आहे की, अजून बरंच काही समोर येईल. या व्यक्तीने खोटी वक्तव्ये केली आहेत", असं आरोहने ट्वीटमध्ये म्हटलं होतं. राहुल गांधींबाबत आरोहने केलेलं हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. हेही वाचा>> Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना ज्यामुळे दोन वर्षांची शिक्षा झाली ते प्रकरण नेमकं काय आहे? नेमकं प्रकरण काय? २०१९ लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत एक वक्तव्य केलं होतं. कर्नाटकातील एक सभेत "नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांच्या आडनावांमध्ये समान धागा काय आहे? सगळ्या चोरांचं आडनाव मोदी का?" असं राहुल गांधी म्हणाले होते. यासंदर्भात गुजरातच्या सुरतमधील जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींचा अपमान केल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी गुरुवारी(२३ मार्च) न्यायालयाने राहुल गांधींना दोषी सिद्ध करून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेल्यामुळे त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला.