मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक उत्तम व्यंगचित्रकारही आहेत. याशिवाय रंगभूमी, मराठी नाटक-सिनेमे यांच्याशी त्यांचं अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक ज्येष्ठ कलाकार राज ठाकरे यांचे जवळचे मित्र आहेत. अनेक मराठी सिनेमांच्या ट्रेलर लॉन्चला, प्रीमियरला ते स्वत: उपस्थित राहतात. कलाकारांचा गोतावळा नेहमीच त्यांच्याभोवती असतो. अशाच एका मराठी रंगभूमीसंदर्भातील जुन्या आठवणीला राज ठाकरेंनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत उजाळा दिला आहे.
राज ठाकरेंना त्यांच्या लायब्ररीत ‘सुख पाहता’ या नाटकाचं पुस्तक सापडलं; ज्याचं मुखपृष्ठ त्यांनी स्वत: रेखाटलं आहे. याबद्दलची खास आठवण त्यांनी या पोस्टमध्ये सांगितली आहे.
राज ठाकरे यांची पोस्ट
काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना, अचानक ‘सुख पाहता’ या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहीत नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना ‘हाऊसफुल’चा बोर्ड लागायचा अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर.
तर हे पुस्तक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो, कारण याचं मुखपृष्ठ मी तयार केलं होतं!
घडलं असं की १९८९ साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की, मी वसंत कानेटकरांचं ‘सुख पाहता’ नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीने विकत घेऊन वाचायची.
असो. मी तेव्हा सामना, मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो.पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकात यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की मी करतो मुखपृष्ठ.
एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती.
आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं. मराठी रंगभूमीवर ‘हाऊसफुल’चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा…
राज ठाकरे
दरम्यान, राज ठाकरे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर मराठी नाट्यरसिकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “खूप छान…मराठी रंगभूमीचा तो सुवर्णकाळ परत येवो हीच सदिच्छा” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टच्या कमेंट्समध्ये दिल्या आहेत.
