Raja Shivaji Movie Box Office Day 2 Collection: ‘राजा शिवाजी’ या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू होती. ट्रेलर पाहिल्यानंतर सिनेमा कधी प्रदर्शित होणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत होते. १ मे २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित झाला.
रितेश देशमुखने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच, तो या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. रितेशबरोबरच जिनिलीया देशमुख, संजय दत्त, भाग्यश्री, सलमान खान, अभिषेक बच्चन, दिशा परदेशी, विद्या बालन, महेश मांजरेकर हे आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा हिंदी व मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती कोटींची केली कमाई?
सध्या हा सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकत असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमातील अनेक सीन सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते सिनेमाचे भरभरून कौतुक करत आहेत. आता राजा शिवाजी चित्रपटाने दोन दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…
प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राजा शिवाजी चित्रपटाने मराठी आणि हिंदी भाषेत ११. ५० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी सिनेमा १२.४० कोटींची कमाई केली होती. यांसह सिनेमाची एकूण कमाई २३. ९० कोटी इतकी झाली आहे.
रितेश देशमुखच्या दोन्ही मुलांनी रियान व राहील यांनी या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, रितेशचा भाऊ धिरज देशमुखही सिनेमात दिसले आहेत. सलमान खान देखील या चित्रपटात जिवा महालेंच्या कॅमिओ रोलमध्ये झळकला आहे. सलमानच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत असल्याचे दिसत आहे. तो ज्या पद्धतीने त्याचे डायलॉग म्हणतो, ते प्रेक्षकांना आवडले असून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत.
दरम्यान, आता आगामी काळात हा सिनेमा आणखी किती कमाई करणार, सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
