Raja Shivaji box office collection day 3: रितेश देशमुखची मुख्य भूमिका असलेला आणि बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘राजा शिवाजी’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.

‘सॅकनिल्क’ च्या ताज्या आकडेवारीनुसार, राजा शिवाजी या चित्रपटाने १२.४० कोटी रुपयांची ओपनिंग केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडी घसरण झाली होती. सिनेमाने शनिवारी ११.५० कोटी कमावले होते. त्या तुलनेत रविवारच्या कमाईत वाढ झाली. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रविवारी तब्बल १३.१० कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाचे तीन दिवसांचे कलेक्शन ३७ कोटी रुपये झाले आहे.

Raja Shivaji box office collection day 3
राजा शिवाजी चित्रपटाचे कलेक्शन

हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत प्रदर्शित झाला आहे. रविवारी हिंदी भाषेतील शोमधून राजा शिवाजी सिनेमाने ३.५२ कोटींचा गल्ला जमवला. तर उर्वरित कमाई मराठी भाषेतून केली. राजा शिवाजी चित्रपटाबरोबर जुनैद खान आणि साई पल्लवी यांचा ‘एक दिन’ हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ‘राजा शिवाजी’च्या कमाईवर कोणताही परिणाम झाला नाही. उलट ‘एक दिन’ चित्रपट दुसऱ्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कोसळला असून त्याने १ कोटी रुपयांपेक्षाही कमी कमाई केली आहे.

राजा शिवाजी चित्रपटातील कलाकार

‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुखसह अभिषेक बच्चन, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे एक मुख्य आकर्षण म्हणजे सलमान खानचा खास कॅमिओ आहे. सलमानची भूमिकाही प्रेक्षकांना फार आवडली असून चित्रपटगृहात प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, रितेश आणि जिनिलीया यांची मुलं राहिल व रियान यांनीही राजा शिवाजी सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं आहे.

राज्यभरातून तसेच महाराष्ट्राबाहेरूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने चित्रपटगृहांकडे वळताना दिसत आहेत. कुटुंबांसह चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होत असून, ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील वर्षातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.