Raja Shivaji Box Office Collection Day 4: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात केली होती. रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ‘राजा शिवाजी’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. जबरदस्त ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईत घट झाली आहे. या चित्रपटाने सोमवारी किती कलेक्शन केले, ते जाणून घेऊयात.

राजा शिवाजी बॉक्स ऑफिस कलेक्शन

राजा शिवाजी सिनेमा रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. ४ दिवसांत सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी चित्रपटाने सर्वात कमी कलेक्शन केले. ‘सॅकनिल्क’ च्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने सोमवारी ५.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाने शुक्रवारी १२.४० कोटी रुपये कमावले व दमदार ओपनिंग केली. शनिवारी या चित्रपटाने ११.५० कोटी कमावले. त्या तुलनेत रविवारच्या कमाईत वाढ झाली. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने रविवारी तब्बल १३.१० कोटी रुपयांची कमाई केली. रविवारच्या तुलनेत सोमवारी या चित्रपटाची कमाई निम्म्याहून कमी झाली. चार दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४२.६० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

शनिवार व रविवार वीकेंड असल्याने चित्रपटाने चांगली कमाई केली. सर्वसाधारणपणे सोमवारी कोणत्याही चित्रपटाच्या कमाईत घट होते, पण ती घट खूप जास्त असेल तर तो चित्रपट पुढच्या वीकेंडपर्यंत टिकेल की नाही, ती शाश्वती नसते. मात्र ‘राजा शिवाजी’ची सोमवारची कमाई पाहता तो बॉक्स ऑफिसवर फक्त टिकूनच राहणार नाही, तर चांगले कलेक्शनही करेल, असं दिसतंय.

अभिनेता रितेश देशमुखने ‘राजा शिवाजी’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर त्याने दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. हा रितेशने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. या चित्रपटात फक्त मराठीच नाही, तर हिंदी कलाकारांचीही मांदियाळी आहे. चित्रपटात सईबाईची भूमिका त्याची पत्नी जिनिलीया देशमुखने साकारली असून अफजल खानच्या भूमिकेत संजय दत्त आहे.

राजा शिवाजी चित्रपटात अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते या कलाकारांनी दमदार भूमिका वठवल्या आहेत. बॉलीवूडचा भाईजान सलमान खानने सिनेमात कॅमिओ केला आहे. त्याचबरोबर रितेश आणि जिनिलीया यांची मुलं राहिल व रियान यांनीही राजा शिवाजी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नाही तर या चित्रपटातील एका गाण्यात रितेशचे भाऊ धिरज देशमुख यांचीही झलक पाहायला मिळते.