Raja Shivaji Movie Box Office Collection Day 5: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या चित्रपटगृहात इतिहास रचत आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. १०० कोटींच्या भव्य बजेटमध्ये तयार झालेला हा मराठीतील सर्वात महागडा चित्रपट ठरला आहे. ५ दिवसांत या चित्रपटाने ४७.५० कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष आणि प्रतापगडावरील अफजल खान वधाचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने सोमवारी ५.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाने शुक्रवारी १२.४० कोटी रुपये कमावले. शनिवारी या चित्रपटाने ११.५० कोटींचा गल्ला जमवला. रविवारी सिनेमाने तब्बल १३.१० कोटी रुपयांची कमाई केली. रविवारच्या तुलनेत सोमवारी या चित्रपटाची कमाई निम्म्याहून कमी झाली आणि सिनेमाने ५.६० कोटींचे कलेक्शन केले. त्यानंतर मंगळवारी म्हणजेच पाचव्या दिवशी चित्रपटाने ४.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चित्रपटाचे ५ दिवसांचे कलेक्शन ४७.५० कोटी रुपये झाले आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाची कथा
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा एक भव्य प्रवास मांडतो. कथेची सुरुवात शिवरायांच्या बालपणापासून होते. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि शहाजीराजांकडून मिळालेले युद्धकौशल्याचे धडे यात प्रभावीपणे दाखवले आहेत. विशेष म्हणजे शिवरायांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांना स्वराज्याच्या ध्येयाने कसे प्रेरित केले, तेही यात दाखवण्यात आलंय. अफजल खानचा क्रूरपणा आणि त्याला रोखण्यासाठी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून आखलेली रणनीती हा चित्रपटाचा सर्वात अंगावर रोमांच उभा करणारा भाग आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली भेट आणि खानाचा वध हा या कथेचा क्लायमॅक्स आहे. केवळ युद्धच नाही, तर हा चित्रपट महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकतो. आईंबद्दलचा आदर, पत्नी सईबाईबरोबरचं नातं आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे शिवराय यात पाहायला मिळतात.
सुमारे १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा मराठीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचे चित्रीकरण शिवनेरी, रायगड अशा प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थळांच्या प्रतिकृती उभारून करण्यात आले आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटातील कलाकार
चित्रपटात रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते, रियान व राहिल देशमुखसह अनेक मराठी कलाकारांनी यात काम केलंय.
