Riteish Deshmukh Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने प्रेक्षकांना महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शिवरायांची भूमिका साकारणं हे प्रत्येक कलाकारासाठी भाग्याचं आणि आव्हानात्मक असतं. या भूमिकेसाठी रितेशने कशी मेहनत घेतली होती, कोणत्या गोष्टीचं विशेष ट्रेनिंग घेतलं होतं का? याबाबत रितेशने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना खुलासा केला आहे.
रितेश देशमुख म्हणाला, “खरंतर या भूमिकेसाठी मी भरपूर ट्रेनिंग घेतलं होतं. मध्यंतरी माझ्या वेगळ्या एका सिनेमाचं…’हाऊसफुल ५’चं शूट सुरू होतं. तेव्हा सुद्धा ट्रेनर घेऊन मी युरोपला गेलो होतो. चित्रपट सुरू होण्याआधी ट्रेनिंग घेत असताना मला दुखापत झाली. माझा शोल्डर ( खांदा ) फाटला…मी त्यानंतर काहीच करू शकलो नाही. आता ‘हाऊसफुल ५’मध्ये जर तुम्ही मला पाहिलं असेल तर…माझी शरीरयष्टी वेगळी होती. त्यावेळी मी बल्क अप झालो होतो. पण, त्या दुखापतीमुळे हळुहळू मी पूर्ववत जसा आहे तसा झालो.”
“कधी-कधी काय होतं…आपले प्रयत्न जरी प्रामाणिक असले, तरी काही गोष्टी जुळून येत नाहीत. आता दुखापत वगैरे झाली…सर्व ठिके! हरकत नाही…आपण आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करून हा संपूर्ण सिनेमा करायचा हे मी ठरवलं होतं. त्यानंतर मी बाकीच्या गोष्टी शिकून घेतल्या. अॅक्शन सीनसाठी विशेष प्रशिक्षण घेतलं होतं…चित्रपटाला ज्या गोष्टींची गरज होती, ते सगळं मी केलं. सर्वांनीच एकंदर या सिनेमासाठी खूप मेहनत घेतली.”
‘राजा शिवाजी’ सिनेमाला सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांचं संगीत लाभलं आहे. ‘छत्रपती’ या गाण्याच्या निमित्ताने अजय-अतुल यांना तब्बल ८० गायकांच्या समुहाने साथ दिली आहे. हे गाणं ऐकताच क्षणी अंगावर काटा येतो आणि प्रत्येकाच्या अंतर्मनाला हे गीत स्पर्शून जातं.
दरम्यान, या सिनेमात रितेश देशमुखसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख या कलाकारांचा समावेश आहे.
