Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे रोजी संपूर्ण देशभरात मराठीसह हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये रितेश-जिनिलीयासह असंख्य दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटासंदर्भातील अनेक पोस्ट, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता हा ऐतिहासिकपट नेमका कसा आहे? आणि प्रेक्षकांनी हा सिनेमा थिएटरला जाऊन पाहण्याची पाच प्रमुख कारणं कोणती आहेत, जाणून घेऊयात.
१. कथेची उत्तम मांडणी अन् शिवरायांच्या जन्माआधीचा इतिहास
‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेशने लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी तिहेरी जबाबदारी स्वीकारली आहे. आजवर महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे रितेश ‘राजा शिवाजी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर नेमकं काय सादर करणार हे पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते…आणि कथेची मांडणी पाहता रितेश यात नक्कीच यशस्वी झालाय असं म्हणता येईल. या चित्रपटाची कथा एकूण आठ भागांमध्ये सादर करण्यात आली आहे.
शिवरायांच्या जन्माआधीचा दख्खनचा परिसर, आदिलशहा अन् निजामशाहीच्या सरदारांनी दख्खनमध्ये घातलेला हैदोस…हे सगळं पाहून मन हेलावून जातं. यानंतर बाळ शिवरायांचं पुण्यात येणं, शहाजीराजेंनी केलेला माहुलीचा तह, स्वराज्यासाठी घेतलेली शपथ, यादरम्यान बाळराजे आणि शंभूराजे यांच्यातील नातं हे सगळे प्रसंग चित्रपटात उत्तमरित्या सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर ‘राजा शिवाजी’ सिनेमा नक्की पाहावा…
२. अभिनय जमेची बाजू
विद्या बालन ही प्रचंड ताकदीची अभिनेत्री आहे, हे सर्वश्रूत आहे. ज्यावेळी ‘बडी बेगम’ची भूमिका विद्या बालन साकारणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्याचवेळी प्रत्येकाला ती या भूमिकेला १०१ टक्के न्याय देणार याची खात्री होती…आणि विद्यानेही प्रेक्षकांचा विश्वास खरा करून दाखवला आहे. बडी बेगमचा रुबाब, तिचे संवाद, तिच्या डोळ्यात दिसणारी सत्तेची भूक विद्याने सहजपणे कॅरी केली आहे. याशिवाय संजय दत्त सुद्धा संपूर्ण सिनेमात भाव खाऊन गेलाय. स्वत:ला हत्तीची उपमा देणं, कोणाप्रतीच सहानुभूती नसणं, आपल्या ६३ बेगमांची बेदरकार हत्या करणं आणि या सगळ्यापलीकडे जाऊन आपण राजा नाही, तर त्यांचे गुलाम आहोत..ही झळ कुठेतरी मनात शिल्लक असणं या गोष्टी संजय दत्तने उत्तमप्रकारे साकारल्या आहेत.
रितेशच्या दोन्ही मुलांचं या सिनेमाच्या निमित्ताने इंडस्ट्रीत पदार्पण झालं आहे. या दोघांनीही बाळ शिवरायांची भूमिका सुंदर अन् तेवढीच जबाबदारीने साकारली आहे. विशेषत: रियानने पडद्यावर महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे सादर केले आहेत. त्यामुळे तुम्ही विद्या बालन अन् संजय दत्तच्या अभिनयाचे आणि देशमुख कुटुंबीयांचे चाहते असाल तर हा सिनेमा नक्की बघा. शेवटी जिवा महालेंच्या कॅमिओ रोलमध्ये सलमान खान सुद्धा भाव खाऊन गेला आहे.
३. चित्रपटाचं संगीत
‘छावा’ला अजय-अतुल यांनी संगीत दिलं असतं, तर काय झालं असतं? असा प्रश्न ज्यांना-ज्यांना पडलाय. त्या सगळ्यांनी ‘राजा शिवाजी’ सिनेमा आवर्जून पाहावा. ‘हे देवा महादेवा’, ‘माझा संभा’, ‘छत्रपती अँथम गाणं’, ‘जय शिवराय’, ‘फूल पारिजात’, ‘साता जन्माची गाठ’ ही गाणी ऐकल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. या सिनेमाचं संगीत सर्वार्थाने उजवं आहे. अनेक ठिकाणी सिनेमा फक्त बॅकग्राऊंड म्युझिकवर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
४. रितेश-जिनिलीयाची ऑनस्क्रीन जोडी
आदर, स्वराज्याबद्दलचं प्रेम, आपुलकी, जबाबदारी या सगळ्या भावना रितेश-जिनिलीयाचे ‘राजा शिवाजी’ सिनेमातील ऑनस्क्रीन सीन्स पाहताना जाणवतात. दोघांची शेवटची भेट पाहून मन अगदी भरून येतं…या दोघांनीही सुंदर काम केलंय. जिनिलीयाचा मूळ स्वभावच शांत अन् मृदू आहे. त्यामुळे सईबाई राणीसाहेबांच्या भूमिकेसाठी जिनिलीयाचं कास्टिंग अगदी परफेक्ट जमून आलं आहे.
५. महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी…
आपला राजा, आपला अभिमान! छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी आणि आजच्या पिढीने आपला इतिहास सविस्तर जाणून घेण्यासाठी नक्कीच हा सिनेमा पाहिला पाहिजे.
याशिवाय या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार एकत्र आले आहेत. रितेशसह संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांसारखे दमदार कलाकार यामध्ये एकत्र झळकले आहेत.
