Raja Shivaji Box Office Collection Day 1: रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित चित्रपट ‘राजा शिवाजी’ अखेर १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. रितेश देशमुखने या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले असून, पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. दमदार ओपनिंग करत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला असून मराठी चित्रपटसृष्टीला नवं संजीवनी दिली आहे.
‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने हिंदीसह मराठी सिनेविश्व गाजवणाऱ्या रितेश देशमुखने आता दिग्दर्शनात पदार्पण केलंय. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रितेशने साकारली असून सईबाईंच्या भूमिकेत त्याची पत्नी जिनिलीया देशमुख आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. अखेर ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. उत्तम कलाकारांची फौज असलेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे.
राजा शिवाजी चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने धमाकेदार पदार्पण ओपनिंग केली आहे. या सिनेमाने पहिल्याच दिवशी तब्बल १२.४० कोटींची निव्वळ कमाई केली आहे. ही मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे. त्याचबरोबर, हा २०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग करणारा तिसरा चित्रपट ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने ८ कोटी रुपये मराठी भाषेतून कमावले आहेत.

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमाबद्दल बोलायचं झाल्यास हा चित्रपट हिंदी व मराठी दोन भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात संजय दत्त अफजल खानच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर विद्या बालन, भाग्यश्री, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, अभिषेक बच्चन यांच्यासह दिग्गज कलाकारांची फौज आहे. रितेश देशमुखची दोन्ही मुलं रियान व राहील यांनीही या सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केलंय. त्याचबरोबर सलमान खान देखील या चित्रपटात जिवा महालेंच्या कॅमिओ रोलमध्ये झळकला आहे.
रितेशच्या चित्रपटाला ओपनिंग चांगली मिळाली आहे. आता वीकेंडला म्हणजेच शनिवार व रविवारी या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट वीकेंडला किती कलेक्शन करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
