Raja Shivaji Box Office Collection Day 8: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखची महत्त्वाकांक्षी कलाकृती असलेल्या ऐतिहासिक ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ८ दिवसांत ६० कोटींचा टप्पा ओलांडून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे. शिवरायांचा देदिप्यमान इतिहास जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच आठव्या दिवशी चित्रपटाने ३.२० कोटींची कमाई केली आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपट महाराष्ट्रदिनी, १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन ८ दिवस झाले आहे. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटाने रिलीजनंतरच्या दुसऱ्या शुक्रवारी किती कमाई केली, ते जाणून घेऊयात.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.४० कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ११.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर तिसऱ्या दिवशी तब्बल १३.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर चौथ्या दिवशी ६.२० कोटी, पाचव्या दिवशी ५.४०, सहाव्या दिवशी ४.७० कोटी, सातव्या दिवशी ४.४० कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर आठव्या दिवशी या चित्रपटाने ३.२० कोटी रुपयांची कमाई केली. ‘राजा शिवाजी’चे एकूण कलेक्शन ६०.९० कोटी रुपये झाले आहे.
राजा शिवाजी ट्रेलर
‘राजा शिवाजी’ चित्रपटाची कथा
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील संघर्षाचा आणि स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा एक भव्य प्रवास मांडतो. कथेची सुरुवात शिवरायांच्या बालपणापासून होते. जिजाऊ माँसाहेबांनी त्यांच्यावर केलेले संस्कार आणि शहाजीराजांकडून मिळालेले युद्धकौशल्याचे धडे यात प्रभावीपणे दाखवले आहेत. विशेष म्हणजे शिवरायांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करून त्यांना स्वराज्याच्या ध्येयाने कसे प्रेरित केले, तेही यात दाखवण्यात आलंय. अफजल खानचा क्रूरपणा आणि त्याला रोखण्यासाठी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करून आखलेली रणनीती हा चित्रपटाचा सर्वात अंगावर रोमांच उभा करणारा भाग आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेली भेट आणि खानाचा वध हा या कथेचा क्लायमॅक्स आहे. केवळ युद्धच नाही, तर हा चित्रपट महाराजांच्या वैयक्तिक आयुष्यावरही प्रकाश टाकतो. आईंबद्दलचा आदर, पत्नी सईबाईबरोबरचं नातं आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे शिवराय यात पाहायला मिळतात.
राजा शिवाजी सिनेमात रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते, रियान व राहिल देशमुख हे कलाकार आहेत.
