Raja Shivaji Box Office Collection day 9: चित्रपट हे फक्त कुठल्याही एका गोष्टीमुळे लोकप्रिय ठरत नाहीत किंवा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत नाहीत. एकाच वेळी दिग्दर्शन, लेखन, कथानक, कलाकार, त्यांचा दमदार अभिनय, शूटिंग, बँकग्राऊंड म्युझिक, गाणी या आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमुळे चित्रपट प्रभावी बनतात. त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतो. म्हणूनच अशा सिनेमांना प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतात.

सध्या असाच एक चित्रपट प्रेक्षकांची गर्दी थिएटरमध्ये गर्दी खेचून आणत आहे. हा चित्रपट म्हणजे राजा शिवाजी. १ मे २०२६ रोजी राजा शिवाजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा सिनेमा मराठी व हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

राजा शिवाजी या चित्रपटात अनेक मराठी व हिंदी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन रितेश देशमुखने केले आहे. तसेच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकादेखील साकारली आहे. त्याबरोबरच जिनिलीया देशमुख, भाग्यश्री, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, अशोक समर्थ, सलमान खान, फरदीन खान, विद्या बालन, अभिषेक बच्चन, संजय दत्त, बोमन इराणी, दिशा परदेशी, सुहास शिरसाट, शिवानी मुंढेकर, कपिल होनराव असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत आहेत.

‘राजा शिवाजी’ सिनेमाने किती कोटींची केली कमाई?

कलाकारांच्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबरच या चित्रपटातील गाणी लक्षवेधक ठरली आहेत. या चित्रपटाला अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे. त्यांची गाणी सध्या लोकप्रिय ठरत आहे.

आता नऊ दिवसांत राजा शिवाजी या चित्रपटाने किती कमाई केली ते जाणून घेऊ…

‘सॅल्कनिक’नुसार, राजा शिवाजी सिनेमाने शनिवारी म्हणजेच ९ मे २०२६ रोजी भारतात ५.६० कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची भारतातील एकूण कमाई ६१.४५ कोटी इतकी झाली आहे. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता आहे.

दरम्यान, रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या चित्रपटाला जुनैद खान व साई पल्लवी यांच्या एक दिन या सिनेमाबरोबर स्पर्धा करावी लागली. मात्र, त्याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे पाहायला मिळाले. एक दिन सिनेमाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.