Raja Shivaji Movie BTS Video : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाची सध्या सर्वत्र तुफान चर्चा सुरू आहे. येत्या १ मे रोजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच रितेश अन् त्याच्या टीमने ‘राजा शिवाजी’ सिनेमाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली होती. आता या चित्रपटातील ‘छत्रपती’ गाण्याचा BTS व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.
‘छत्रपती’ या टायटल गाण्यासाठी संगीतकार अजय-अतुल आणि त्यांच्या संपूर्ण टीमने किती मेहनत घेतलीये याची झलक या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. या गाण्याच्या दोन ओळी ऐकताच क्षणी अंगावर काटा येतो. हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं असून, त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केलं आहे. या गाण्यातील प्रत्येक बीट, प्रत्येक स्वर आणि प्रत्येक दृश्यामागे बारकाईने केलेली मेहनत या BTS व्हिडीओतून जाणवतेय. आता संपूर्ण गाणं प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘राजा शिवाजी अँथम’ “छत्रपती” हे गीत १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, या गीतातून हिंदवी स्वराज्य, महाराजांचं शौर्य आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अजय-अतुलसह कोरस टीमने सुद्धा या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
नेटकऱ्यांनी सुद्धा या गाण्याचा BTS व्हिडीओ पाहून कौतुकाचा वर्षाव केला आहे. “अजय-अतुलच्या जोडीला तोड नाही”, “अंगावर काटा आला भाऊ जय शिवराय”, “जगदंब…या सिनेमाला मोठं यश मिळो”, “अजय अतुल सर महाराष्ट्राची शान”, “कमाल…लवकर पूर्ण व्हिडीओ प्रदर्शित करा रितेश सर” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.
रितेश देशमुखसह या चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख यांनी केली आहे.
