Raja Shivaji Movie First Song Chhatrapati : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. या ऐतिहासिक चित्रपटाचं पहिलं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘छत्रपती’ या अँथम गीतासाठी संपूर्ण टीमने किती मेहनत घेतलीये याचा BTS व्हिडीओ अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर हे संपूर्ण गाणं केव्हा ऐकायला मिळणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपली असून आता अधिकृतरित्या हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘छत्रपती’ हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलं असून, त्यांनीच ते आपल्या दमदार आवाजात सादर केलं आहे. अजय-अतुल यांना तब्बल ८० गायकांच्या समुहाने या गाण्याच्या निमित्ताने साथ दिली आहे. या गाण्यातील प्रत्येक बीट, प्रत्येक स्वर आणि प्रत्येक दृश्यामागे बारकाईने केलेली मेहनत या व्हिडीओतून जाणवतेय. याशिवाय अभिनेता सिद्धार्थ जाधवची झलकही यामध्ये पाहायला मिळतेय.

हे गाणं ऐकताच क्षणी अंगावर काटा येतो आणि प्रत्येकाच्या अंतर्मनाला हे गीत स्पर्शून जातं. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी या गीताचं नृत्यदिग्दर्शन केलं. या गाण्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारी ऊर्जा, अभिमान आणि एकात्मता ही ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या भव्यतेची साक्ष देते.

या गीताबाबत बोलताना संगीतकार अजय-अतुल म्हणतात की, “हे गाणं फक्त भव्य असावं इतकंच आमचं ध्येय नव्हतं, तर त्यात भावना, प्रामाणिकपणा आणि महाराजांप्रती असलेल्या आदराची जाणीव असणं या गोष्टी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. प्रत्येक सूरामध्ये एक जबाबदारी आहे. जर या गीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले, तर ते आमच्यासाठी खरं यश आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हे गीत प्रेक्षकांच्या मनात कायम राहावं, हीच खरी आपल्या महाराजांसाठी मानवंदना ठरेल.”

रितेश विलासराव देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात दिग्गज आणि बहुआयामी कलाकारांची फळी एकत्र आली आहे. यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांचा समावेश आहे.

‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.