शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुखने त्याच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, यात सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याच्या कमेंटची.
पोस्टरमध्ये अभिनेता-दिग्दर्शक रितेश विलासराव देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात अत्यंत प्रभावशाली दिसत आहे. त्याच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, चेहऱ्यावरील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्याचे व्यक्तिमत्व महाराजांच्या शौर्याची प्रचिती देते.
गेल्या वर्षी ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास दाखवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. विकीच्या भूमिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं होतं.
पाहा कमेंट

‘छावा’ चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने, रितेश देशमुखच्या पोस्टवर “आबासाहेब” अशी कमेंट करत रितेशला मानाचा मुजरा दिला आहे. ही कमेंट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून ‘शंभूराजेंनी शिवरायांना दिलेली ही साद’ असल्याचे म्हटले जात आहे.
केवळ विकीच नाही, तर चित्रपटसृष्टीतील सायली संजीव, मिलाप झवेरी, रमेश तौरानी, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, अमृता खानविलकर, मनीष पॉल, राहुल देव, लिझेल रेमो डिसूझा आणि मुश्ताक शेख यांसारख्या दिग्गज कलाकारांनी आणि निर्मात्यांनी देखील पोस्टर शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत.

या चित्रपटात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भक्कम फौज एकत्र पहायला मिळणार आहे. सिनेमाच्या संगीतात भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीत सम्राट अजय–अतुल यांची जादू अनुभवायला मिळणार आहे. जिनिलीया रितेश देशमुख, रितेश विलासराव देशमुख दिग्दर्शित, मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपट ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ रोजी म्हणजेच ‘महाराष्ट्र दिना’च्या दिवशी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. जिजाऊ माँसाहेब, शहाजी राजे आणि इतर भूमिकांसाठी नेमके कोणते कलाकार आहेत, याची अधिकृत घोषणा निर्मात्यांनी अद्याप केलेली नाही.
