Riteish Deshmukh’s Raja Shivaji Movie : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी ऐतिहासिक कमाई केली आहे. या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १२.४० कोटींचा गल्ला जमावला आहे. आजवर कोणत्याही मराठी सिनेमाने पहिल्याच दिवशी एवढी कमाई केली नव्हती. त्यामुळे सध्या सर्वत्र रितेश अन् टीमचं कौतुक करण्यात येत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर रितेश-जिनिलीया आपल्या दोन्ही मुलांसह तुळजापूरला आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते. यानंतर हे कुटुंबीय लातूरला गेले. लातूरला रितेश-जिनिलीयाचं जंगी स्वागत करण्यात आलं. याशिवाय मनोरंनज विश्वातून सुद्धा ‘राजा शिवाजी’ सिनेमावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
पण, सिनेमाला भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच रितेश देशमुखने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सर्व प्रेक्षकांना एक महत्त्वाची विनंती केली आहे. “कृपया चित्रपट पाहताना व्हिडीओ काढून सोशल मीडियावर अपलोड करू नका” असं रितेशने चाहत्यांना सांगितलं आहे.
रितेश म्हणाला, “नमस्कार! आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘राजा शिवाजी’ हा आमचा चित्रपट नुकताच तुम्हा सर्वांच्या भेटीला आला आहे. आता सिनेमा स्वत:चा समजून तुम्ही इतक्या प्रेमाने पाहाताय…चित्रपटाला संपूर्ण देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय…त्याबद्दल मी आणि ‘राजा शिवाजी’ सिनेमाची संपूर्ण टीम तुमची ऋणी आहे. फक्त एक विनंती आता तुम्हाला सर्वांना मी करू इच्छितो. तुम्हा सर्वांच्या भावना मला समजत आहेत…तुम्ही थिएटरमध्ये त्याच उत्सुकतेपोटी व्हिडीओ काढून बाहेर शेअर करताय. पण, प्लीज एकच विनंती करतो…प्लीज व्हिडीओ पोस्ट करू नका. कारण, जे इतर लोक सिनेमा पाहायला जाणार आहेत…त्यांच्याही मनात ही उत्सुकता टिकून राहिली पाहिजे. त्यांनाही सिनेमा पाहून छान वाटलं पाहिजे. प्लीज त्यामुळे व्हिडीओ शेअर करू नकात. बाकी तुमचा प्रतिसाद असाच असूद्यात! जय शिवराय!”
रितेशच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत, “या विनंतीचं आम्ही पालन नक्की करू” असं आश्वासन रितेशला दिलं आहे. दरम्यान, राजा शिवाजी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, यामध्ये रितेशसह महेश मांजरेकर, भाग्यश्री, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती या सर्व जबाबदाऱ्या रितेशने समर्थपणे सांभाळल्या आहेत. याशिवाय रितेशच्या दोन्ही मुलांनी म्हणजेच रियान आणि राहील यांनी देखील या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
