Raja Shivaji Movie : ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक सिनेमा १ मे ( महाराष्ट्र दिन ) रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं. चार दिवसांत या सिनेमाने ४० कोटींहून अधिक कमाई केली आहे. मराठीसह हिंदी भाषेतही हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. याशिवाय या चित्रपटात दमदार कलाकारांची मांदियाळी आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमात अभिषेक बच्चन, विद्या बालन, फरदीन खान, संजय दत्त, भाग्यश्री, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी अशा दिग्गज कलाकारांनी काम केलेलं आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या सगळ्या कलाकारांच्या मानधनाची आणि सिनेमाच्या बजेटची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मात्र, या सगळ्या चर्चांना रितेशने पूर्णविराम दिला आहे.
रितेशने नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ‘राजा शिवाजी’ सिनेमात सर्व दिग्गज कलाकारांनी मोफत काम केलं, असा खुलासा केला आहे.
रितेश देशमुख म्हणाला, अभिषेक बच्चन यांनी या सिनेमात मोफत काम केलेलं आहे. सलमान खान, विद्या बालन, बोमन इराणी…इतकंच नव्हे तर रितेश आणि जिनिलीया देशमुख यांनी देखील या चित्रपटात मोफत काम केलं आहे. जेव्हा महाराजांचा विषय येतो…तेव्हा मानधन वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आम्ही हा चित्रपट साकारला आहे. तरी ज्या काही कलाकारांच्या बजेटच्या चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत…कृपया असे काही तर्क लावू नका. आपआपल्या परीने प्रत्येकाने या सिनेमासाठी मनापासून काम केलं आहे. फरदीन खान यांनी देखील चित्रपटात मोफत काम केलं आहे. महाराजांचं नाव ऐकूनच या सगळ्यांनी मोफत काम केलेलं आहे. महाराजांवर आधारित जेवढे सिनेमे येतील…तेवढं चांगलंच आहे. कारण, यामुळे आपला गौरवशाली इतिहास तेवढाच आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
“लहान मुलांनाही आपले महाराज, त्यांचा इतिहास समजला पाहिजे. त्यामुळे, आई-वडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना घेऊन ‘राजा शिवाजी’ सिनेमा पाहायला जावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. सध्या सुट्ट्या सुद्धा सुरू आहेत. त्यामुळे एक चांगला योग जुळून आला आहे. तर, सिनेमा नक्की बघा” असं आवाहन रितेशने सर्व प्रेक्षकांना केलं आहे.
