Raja Shivaji Movie Trailer launch : रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख सध्या त्यांच्या ‘राजा शिवाजी’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या ऐतिहासिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर लाँचला चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत असलेल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी तिथे उपस्थित अभिनेत्री भाग्यश्रीने रितेश व जिनिलीया यांचा सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे.
रितेश देशमुख लिखित, दिग्दर्शित आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे महाराष्ट्र दिनी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर जिनिलीया महाराणी सईबाई यांच्या भूमिकेत झळकणार आहे. निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन करण्यासह या जोडीने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकाही साकारली आहे. त्यांच्यासह या चित्रपटात बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
भाग्यश्रीने सांगितला ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचा किस्सा
सोशल मीडियावर सध्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील कलाकारांचे फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच नुकत्याच पार पडलेल्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात भाग्यश्रीने रितेश व जिनिलीया यांचा सेटवरचा एक किस्सा सांगितला आहे. तिचा हा व्हिडीओसुद्धा समोर आला आहे. यापैकीच एका व्हिडीओमध्ये भाग्यश्री, “नवरा बायकोने एकत्र दिग्दर्शक आणि निर्माती म्हणून काम करणं खूप कठीण असतं. घरी जाऊन त्यांच्यामध्ये किती भांडणं झाली माहीत नाही. पण, सेटवर कधीच वाद झाले नाही.” असं म्हणताना दिसत आहे.
भाग्यश्री पुढे म्हणाली, “मला एक सीन खूप चांगला आठवत आहे. जिजाऊ जशा शिवरायांना जेवण भरवायच्या तसंच दिग्दर्शक (रितेश) कामात इतका व्यग्र होता की रात्र झाली होती आणि आमच्या सगळ्यांचं जेवण झालं होतं. पण तो शॉट सेटअप करण्यात व्यग्र होता. तेव्हा आमच्या निर्मात्या (जिनिलीया) एका ताटात पोळी-भाजी घेऊन त्याच्या मागे मागे जात होती की निदान एक घास खा, त्यामुळे प्रेम असावं तर असं.”
रितेश जिनिलीया यांनी यापूर्वीसुद्धा अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे आणि काही चित्रपटांत त्यांनी दिग्दर्शन व निर्मित या जबाबदाऱ्या सुद्धा पार पाडल्या आहेत. परंतु, ‘राजा शिवाजी’ हा बिग बजेट चित्रपट असून हा चित्रपट बनवणं रितेशचं स्वप्न होतं. असं त्याने नुकत्याच पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या ग्रँड फिनालेमध्येसुद्धा सांगितलं आहे. ट्रेलर लाँचच्या दरम्यान रितेश-जिनिलीया आणि गायक अजय गोगावले ही मंडळी भावुक होताना दिसले. रितेश-जिनिलीया व अजय यांना भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
