Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Trailer : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. अशातच नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर समोर आला. सोशल मीडियावर सध्या या ट्रेलरचीच चर्चा सुरू आहे.
‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. त्यानेच या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. मात्र, ट्रेलरमधील एका सीनवरून सध्या चर्चा सुरू झाली आहे.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज (रितेश देशमुख) अफजल खानाला वाघनखे दाखवताना दिसत आहेत. त्यावर काही नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इतिहासाच्या संदर्भानुसार, अफजल खानाने हल्ला करेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे लपवून ठेवली होती, असा दावा नेटकरी करत आहेत.
सुरेश नाखुआ यांची पोस्ट
अशातच भाजपाच्या सुरेश नाखुआ यांनीही संबंधित सीनवर एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे, “रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला उघडपणे वाघनखे दाखवताना दिसत आहेत. ऐतिहासिक सत्य हे आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाने हल्ला केल्यानंतरच वाघनखांचा वापर केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला आधी वाघनखे दाखवली होती का? रितेश देशमुख इतिहासाची मोडतोड का करत आहे?”
The trailer of Riteish Deshmukh’s film shows Chhatrapati Shivaji Maharaj openly displaying the Wagh Nakh to Afzal Khan before the attack.
— Suresh Nakhua ?? (@SureshNakhua) April 22, 2026
It is historical fact that "Wagh Nakh" was concealed and Chhatrapati Shivaji Maharaj used it only after attack by Afzal.
WHY IS @RITEISHD… https://t.co/u3yls4ojPf pic.twitter.com/CWvAgKagmB
रितेश देशमुखने दिलेले उत्तर
नाखुआ यांच्या या टीकेला रितेशने अतिशय संयमितपणे उत्तर दिले आहे. त्याने उत्तरात लिहिले, “सर, कृपया १ मे रोजी चित्रपट नक्की पाहा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर चित्रपटामध्येच आहे. मला खात्री आहे की, तुम्ही आपल्या कुटुंबीयांबरोबर आणि मित्रांबरोबर या चित्रपटाचा आनंद घ्याल, जय शिवराय!”
Respected Sir, pls do watch the film on 1st May.. the answer to your question is there in the movie. I hope you enjoy the film with your friends and family. Jai Shivrai ?? https://t.co/RyzDUnpl4x
— Riteish Deshmukh (@Riteishd) April 22, 2026
रितेशच्या या उत्तरावर नाखुआ यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे, “सत्य चित्रपटात आहे का? ‘उत्तरासाठी चित्रपट पाहा’ हे उत्तर काल्पनिक कथांसाठी ठीक आहे; पण इतिहासासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटाच्या ट्रेलरने प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत; प्रश्न निर्माण करू नयेत”, असं त्यांनी म्हटलं आहे.
So the truth is ‘inside the film’?
— Suresh Nakhua ?? (@SureshNakhua) April 22, 2026
"Watch the film for answers" is fine for fiction, not history.
When depicting Chhatrapati Shivaji Maharaj, the trailer itself should answer questions, not raise them.
Interesting strategy : Market Doubt, Sell Clarification. https://t.co/uaWksP411C
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अजय-अतुल यांच्या संगीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात रितेशबरोबरच संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलीया देशमुख यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘राजा शिवाजी’ कधी प्रदर्शित होणार?
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित केला जाणार आहे. मराठीसह हिंदी व तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
