Riteish Deshmukh Raja Shivaji : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात या चित्रपटाची चर्चा सुरू होती. गेल्या १० वर्षांपासून रितेशने या सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रीमियर शोला अनेक मराठी कलाकार पोहोचले होते. याशिवाय ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची टीमही यावेळी उपस्थित होती. राखी सावंत सुद्धा एकदम मराठमोळा लूक करून ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रीमियरला आली होती. यावेळी तिने रितेशच्या दोन्ही मुलांचं भरभरून कौतुक केलं.
‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सर्वांना यामध्ये सुरुवातीलाच रितेशचा धाकटा मुलगा राहील देशमुखची झलक पाहायला मिळाली होती. पण, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या सिनेमात फक्त राहीलच नसून रियानने देखील महत्त्वाची भूमिका साकारल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘राजा शिवाजी’मध्ये राहीलने बाळ शिवरायांची भूमिका साकारली आहे. तर, रितेशचा मोठा मुलगा रियानने महाराजांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा मोठ्या पडद्यावर साकारला आहे. जिजाऊ माँसाहेबांबरोबर पुण्यात येणं, याठिकाणी रयतेत मिळून मिसळून राहणं…तलवारबाजी व अन्य प्रशिक्षण घेणं, सईबाई राणीसाहेबांबरोबर झालेलं लग्न, १६ व्या वर्षी रायरेश्वर मंदिरातील स्वयंभू शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक करून ‘हिंदवी स्वराज्याची’ शपथ घेतली, तो महत्त्वाचा क्षण…याचा यामध्ये समावेश होतो.
राहील अन् रियानने साकारलेल्या भूमिकांचं सध्या सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात आहे. एवढे दिवस फक्त राहील सिनेमात झळकणार असं सर्वांना वाटत होतं. पण, रियानला सुद्धा सिनेमात पाहून रितेश-जिनिलीयाचे चाहते प्रचंड आनंदी झाले आहेत. १२ वर्षीय रियानने ज्या जबाबदारीने ही भूमिका साकारलीये…त्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

राखी सावंत काय म्हणाली?
अभिनेत्री राखी सावंत म्हणते, “रितेश देशमुख यांच्या मुलाने खरंच खूप सुंदर काम केलं आहे. त्याला कोणीच बालकलाकार बोलणार नाही…इतकं सुंदर काम त्याने केलं आहे. ओह माय गॉड…खूपच सुंदर!”
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा सिनेमा १ मे रोजी संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. याचं दिग्दर्शन रितेश देशमुखने केलं असून, या सिनेमाच्या निर्मात्या जिनिलीया देशमुख व ज्योती देशपांडे आहेत.
