Ramesh Pardeshi on Dog Bite: अनेकदा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना पाहायला मिळतात. त्यामध्ये काही जण गंभीर जखमीदेखील होतात. आता मुळशी पॅटर्न या सिनेमात पिट्या भाई ही भूमिका साकारणारे रमेश परदेशी यांनादेखील कुत्रा चावला आहे. त्याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत माहिती दिली आहे.

“काल नेहमीप्रमाणे अराई टेकडीवर पळायला गेलो…”

रमेश परदेशी यांनी सोशल मीडियावर इंजेक्शन घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, “टेकडीवर कोण असायला हवे? ससे, मोर, फिरायला येणारी तरुण, लहान मुले. वृद्ध मालकांबरोबर येणारे पाळीव प्राणी, वृक्षप्रेमी की भटकी कुत्री?”

“काल नेहमीप्रमाणे अराई टेकडीवर पळायला गेलो होतो. पळत असताना एका ठिकाणी चार ते पाच कुत्री काहीतरी खात होती. तिथून जाताना त्यातल्या एका कुत्र्याने माझ्या मांडीचा चावा घेतला. मी तसाच पुढे गेलो, तर माझ्यासारखाच एक प्राणीप्रेमी मित्र १० ते १२ कुत्र्यांना खायला देत होता. मीसुद्धा कधी कधी शहरात उपाशी कुत्र्यांना पाव, बिस्किटे देत असतो. मी त्याला म्हणालो की, कुत्र्यांना इथे खायला देऊ नकोस. मला आताच एक कुत्रा चावला आहे. नाही तर लहान मुले, वृद्ध यांच्या अंगावर येतात. त्यानंतर मी तिथून निघून गेलो.”

पुढे त्यांनी लिहिले, “घरी आल्यावर अंघोळ करताना लक्षात आले की, आपल्याला मगाशी किरकोळ चावले आहे, असे जे वाटलेलं ते जास्त दुखत आहे. म्हणून सकाळी सरकारी दवाखान्यात गेलो. तर त्यांनी सांगितलं की, पाच इंजेक्शनं घ्यावी लागतील. आता दोन घेतली आणि अजून सात दिवसांच्या अंतराने बाकी घ्यायची आहेत. हेच एखाद्या लहान मुलाला किंवा वृद्ध माणसाला चावले असते, तर केवढ्याला पडले असते.”

“मीसुद्धा प्राणीप्रेमी आहे; पण मला वाटतंय की, या भटक्या कुत्र्याची राहण्या-खाण्याची काहीतरी बरी सोय केली पाहिजे. आज एक अंगावर आला, चावला, मी प्रतिकार करू शकलो; पण १०-१२ कुत्री एकदम अंगावर आली आणि बरे-वाईट काही झाले, तर जबाबदार कोण? अजून खूप जबाबदाऱ्या अंगावर आहेत.

“शहरातल्या भटक्या कुत्र्यांना जर एका ठिकाणी जमा केले आणि त्यांची नसबंदी केली, तर पीएमसीचं कामसुद्धा एका ठरावीक ठिकाणी रीतसर आणि सुसह्य होईल. जे कोणी प्राणीप्रेमी मित्र आहेत, ते त्या ठिकाणी येऊन त्यांच्याशी खेळतील. त्यांचं आजारपण डॉक्टर बघतील. सगळं एका ठिकाणी होईल.”

“माणसं रस्त्यावर आणि टेकडीवर सुरक्षित फिरतील. कुत्री घाबरून भीतीपोटी त्यांच्यावर हल्ला करणार नाहीत. माणसाचा आणि कुत्र्याचा दोघांचा जीव अतिशय महत्त्वाचा आहे. दोन्ही जीव सुरक्षित राहतील. सरकारला विनंती आहे की, त्यांनी याची दखल घ्यावी. नगरसेवक, आमदार, महापौर सर्वांना विनंती आहे की, भटक्या कुत्र्यांची काहीतरी चांगली सोय करावी. या मुक्या प्राण्यांवरसुद्धा अन्याय होणार नाही, तेसुद्धा छान जगतील आणि बाकी नागरिकसु्द्धा छान जगू शकतील.”

शेवटी त्यांनी “परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको व्हायला”, अशी आशा व्यक्त केली.