Chhaya Kadam special post for Ravi Jadhav: रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीझरमध्ये ढोलकी, लावणी, घुंगरू पाहायला मिळतात. लावणीवर आधारित या सिनेमाबद्दल चाहत्यांसह कलाकारांच्या मनातही उत्सुकता निर्माण झाली आहे.
“पुन्हा एकदा इतिहास घडवणारा चित्रपट अनुभवायला मिळणार”, छाया कदम काय म्हणाल्या?
अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर फुलवरा या सिनेमाचा टीझर शेअर केला. हा टीझर शेअर करताना छाया कदम यांनी लिहिले, “चित्रपटांच्या दुनियेत अभावानेच अशी जिव्हाळ्याची, आपलीशी वाटणारी आणि प्रेमाची माणसं भेटतात, जी प्रत्येक प्रसंगात आपल्या बरोबर असतात. त्यांच्या असण्याचा एक वेगळाच आधार असतो.”
त्यांनी असेही लिहिले, “ज्यांच्यासोबत काम करावं, असं मनापासून वाटतं, अशी ही सुंदर जोडी आहे. रवी आणि मेघना, तुमच्यावर माझं प्रेम आहे. एक जण आपल्या मनात सुचलेलं, डोक्यात आकार घेत असलेलं स्वप्न पडद्यावर उतरवण्यात मग्न आहे; तर दुसरी अत्यंत खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते.”
पुढे त्यांनी रवी जाधव यांना उद्देशून लिहिले, “रवी, तुझे चित्रपट, त्यातली गाणी, व्यक्तिरेखा, गोष्ट, रंगसंगती, सगळंच एक वेगळं गारूड घालणारं असतं. पुन्हा एकदा इतिहास घडवणारा चित्रपट अनुभवायला मिळणार, असा मनापासून विश्वास वाटतोय. नऊवारी साड्यांचा घोळ, त्यात अडकणारी, तरीही वेगानं धावणारी पावलं, सहावारी साडी, पाण्यात भिजलेली, चिखलात माखलेली पावलं…वेगवेगळ्या घुंगरांचा नाद आणि जोडीला अस्सल मराठमोळी वाद्यं आहेत. काहीतरी फारच भारी घडतंय. काहीतरी असं, जे मनावर गारूड घालतंय. काट्याकुट्यांतून, चिखल-पाण्यातून धावणारी ही लावणी, तिचा बाज, तिचा थाट आणि तिचा संघर्ष आहे.”
शेवटी त्यांनी लिहिले, “खूप खूप शुभेच्छा! हा कलाविष्कार मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी मी भारी उत्सुक आहे.”
छाया कदम यांच्या पोस्टवर रवी जाधव यांनी कमेंट करीत, “थँक्यू अक्का”, असे लिहिले आहे. तसेच, मेघना जाधव यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, फुलवरा या सिनेमाच्या टीझरने जरी सर्वांचे लक्ष वेधले असले तरी सिनेमात कोणते कलाकार दिसणार आहेत हे समोर आलेले नाही.
