Ravi Jadhav Talk About Ajay-Atul : ‘वाजले की बारा’, ‘अप्सरा आली’, ‘खेळ मांडला’, ‘नटरंग उभा’… लोकप्रिय मराठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘नटरंग’ सिनेमात ही सर्व गाणी होती. मात्र, ‘नटरंग’नंतर अजय-अतुल आणि रवी जाधव यांनी एकत्र कामच केलं नाही. याबद्दल रवी जाधव यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘नटरंग’सारख्या सिनेमानंतर रवी जाधव यांनी ‘बालगंधर्व’ ‘टाइमपास’ आणि असे अनेक सिनेमे केले. मात्र ‘नटरंग’नंतरच्या सिनेमांसाठी संगीतकार म्हणून रवी जाधव यांनी अजय-अतुल यांच्याबरोबर काम केलं नाही. याचाच खुलासा रवी जाधव यांनी केला.
अमोल परचुरेंच्या कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत रवी जाधव म्हणाले, “‘नटरंग’नंतर अजय-अतुलचे जेवढे लाईव्ह शो झाले, त्या सगळ्यांचं कँपेनिंग मी केलं. त्या सगळ्यांचं शूटिंग मी केलं आहे. त्या दोघांचे सर्वोत्तम फोटो माझ्याकडे आहेत. आम्ही प्रत्येकवेळी खूप एन्जॉय केलं. ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’मध्ये ‘डॉल्बीवाल्या’ गाण्याच्या शूटिंगला मी गेलो होतो. फक्त आम्ही सिनेमासाठी एकत्र काम नाही केलंय.”
‘नटरंग’नंतर अजय-अतुलबरोबर सिनेमा केला नाही कारण
पुढे ते म्हणाले, “‘नटरंग’नंतर ‘बालगंधर्व’ सिनेमा केला, ज्यात नाट्यसंगीत होतं. मग ‘बालक-पालक’ केला, ज्यात संगीतच नव्हतं. मग ‘टाईमपास’मध्ये माझा हा विचार होता की, काहीतरी नवं करुया, म्हणून त्यांना सांगितलं नाही. अजय-अतुल हे माझ्या मनात दैदिप्यमान संगीतकार आहेत. ‘बँजो’च्यावेळी आम्ही एकत्र काम करणार होतो; पण काही कारणामुळे आम्ही तो सिनेमा करू शकलो नाहीत.
यानंतर रवी जाधव यांनी सांगितलं, “अजय-अतुल यांचं आणि माझं कधीच भांडण झालं नाही. अजय-अतुल लाईव्हचं पोस्टर आणि लोगो मी केला आहे. हे सगळं ‘सैराट’च्या नंतरच झालंय. अजय-अतुल माझ्यासाठी आधीही दैवी होते आणि आताही दैवीच आहेत.”
“माझ्याकडे खास असं काहीतरी असेल, तेव्हा मी त्यांना…”
यापुढे रवी जाधव अजय-अतुल यांच्याबरोबर एकत्र काम करण्याविषयी म्हणाले, “ज्यावेळी मला असं वाटेल ना, की त्यांच्याकडे घेऊन जायला माझ्याकडे खास असं काहीतरी असेल, तेव्हा मी त्यांना अप्रोच करेन. कारण ते सध्या अनेक मोठमोठे प्रोजेक्ट करतात. ते सध्या खूप व्यग्र आहेत. त्यांच्या संगीताची प्रक्रिया मी पाहिलीय. ते दिवस-रात्र, वेळ-काळ काही पाहत नाहीत. त्यांना पाच-सहा महिन्यांत संगीत दयायला सांगितलं तर मग त्यांच्या संगीतातून त्यांची जी क्वालिटी आहे ती देत नाहीत. ते वेळ घेतात. पण ते जे संगीत देतात, ते काहीतरी दैवीच असतं. रितेशबरोबर ‘राजा शिवाजी’ सिनेमा केला असता; तर नक्कीच संगीतकार म्हणून अजय-अतुलच असते. त्यांच्याशिवाय कुणीच संगीत केलं नसतं.”
