Resham Tipnis shares Video: लोकप्रिय अभिनेत्री रेशम टिपणीस सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत, याबद्दल जाणून घेऊ…
“मी अनेक वेळा धडपडली…”
रेशम टिपणीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्या म्हणाल्या, “हाय फ्रेंड्स, तुम्ही कसे आहात? मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी स्वावलंबी, एक सशक्त स्त्री आहे. म्हणजे मी अनेक वेळा धडपडली आहे. परत स्वत:ला सांभाळलं आहे आणि जोमाने परत काम सुरू केलं आहे.”

पुढे त्या म्हणाल्या, “आता मला काहीतरी वाटायला लागलं आहे. दिवसाच्या शेवटी, मी जेव्हा घरी जाते. दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडल्यानंतर माझी वाट बघणारं कोणीच नसतं. म्हणजे आता असं वाटायला लागलं आहे की कोणीतरी असं असायला पाहिजे ना, जो बेल वाजल्यानंतर दरवाजा उघडेल. एक छानशी उबदार मिठी मारेल आणि एक गरमागरम कॉफी देईल.”

त्या असेही म्हणाल्या, “माझा दिवस कसा गेला, हे जेव्हा मी त्याला सांगेन. तेव्हा तो ते शांतपणे ऐकून घेईल. समजून घेईल. असा कोणीतरी हवा आणि मी त्याच श्रीमानच्या शोधात आहे. तर, मला शुभेच्छा द्या की मला माझा श्रीमान मिळेल.”
हा व्हिडीओ शेअर करताना त्या म्हणाल्या, “कधी कधी कोणीतरी सोबत असावं असं वाटतं. एक नवीन सुरुवात व्हावी, याची वाट पाहत आहे.”

दरम्यान, रेशम टिपणीस यांनी या व्हिडीओबद्दल जास्त काही स्पष्टपणे सांगितलं नाही. आता आगामी काळात त्या याबद्दल आणखी काही बोलणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
