उत्तराखंड येथील केदारनाथ धाम भगवान शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने केदारनाथ यात्रेला जातात. ही यात्रा फारच कठीण आहे, त्यामुळे असंख्य भाविक केदारनाथ यात्रेसाठी हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचा मार्ग निवडतात. मात्र, काही वर्षांपूर्वी अभिनेत्री रिंकू राजगुरूने अचानक केदारनाथला जायचं ठरवलं होतं. हेलिकॉप्टरचं बूकिंग पटकन उपलब्ध होत नाही, त्याची प्रक्रिया वेगळी असते. त्यामुळे रिंकू दर्शनासाठी जाताना पायी पर्वत चढून गेली होती. केदारनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,५८३ मीटर (११,७५५ फूट) उंचीवर आहे. त्यामुळे पुन्हा एवढा मोठा पर्वत उतरून खाली येणं तिला जमणार नव्हतं. यावेळी रिंकू प्रचंड रडली होती.

रिंकूने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिचा केदारनाथ यात्रेचा अनुभव सांगितला आहे. रिंकू म्हणाली, “केदारनाथ यात्रेचा अनुभव हा माझ्यासाठी न विसरण्यासारखा आहे. माझ्या अचानक मनात आलं की, काहीही करून आपण केदारनाथला जायचं. संपूर्ण यात्रा चालत पूर्ण करायची असं माझं ठरलं. मी प्रचंड थकले होते, रडले…मला जमतच नव्हतं. माझं दर्शन झालं आणि मी अक्षरश: रडत होते…माझं इतकंच म्हणणं होतं मला पुन्हा खाली जाण्यासाठी देवा… प्लीज हेलिकॉप्टर मिळूदेत! मला अजिबात चालत उतरायचं नव्हतं…तिथे एक माणूस होता तो आम्हाला म्हणाला…बसा तुम्ही मिळेल. एक तास झाला, दोन तास झाले तरीही हेलिकॉप्टर उपलब्ध झालं नव्हतं.”

रिंकू पुढे म्हणाली, “हळुहळू खूप वेळ झाला आणि सगळीकडे अंधार पडू लागला…आणि दुसऱ्यादिवशी आमचं फ्लाइट होतं. मी देवाकडे प्रार्थना करू लागले…प्लीज काहीही करून हेलिकॉप्टर मिळूदेत. त्यानंतर एक माणूस आला आणि तो म्हणाला…आता हेलिकॉप्टर वगैरे मिळणार नाही, सगळं बूकिंग आधीपासून फुल आहे. माझी इतकी चिडचिड झाली…मी फक्त रडत होते. देव माझं काहीच ऐकत नाहीये वगैरे असं सगळं सतत बोलत होते. शेवटी मागून एक माणूस आला त्याने मला बोलावलं. त्याने मला विचारलं, तुम्हाला खाली जायचंय ना? हेलिकॉप्टर हवंय का? तुमच्याकडे आधारकार्ड आहे का? पायलटकडे फक्त दोन जागा उपलब्ध आहेत.”

“अखेर देवाने माझं ऐकलं…हेलिकॉप्टरची सोय झाली. मी त्याच आनंदाच मंदिराजवळ पळत-पळत जात होते आणि धाडकन् पडले. माझा गुडघा फुटला…मी देवाची क्षमा मागितली. यापुढे मी देवाला कधीच काही बोलणार नाही असं ठरवलं. त्या हेलिकॉप्टरच्या रांगेत अनेक लोक वेटिंगला बसले होते पण, त्या माणसाने फक्त आम्हालाच का बोलावलं हे मला माहिती नाही. माझी मैत्रीण पूजा सुद्धा मला तेव्हा ओरडली होती. तिथून आल्यावर सगळं बदललं…आता मला माझ्या आई-बाबांना घेऊन तिथे जायचंय.” अशा भावना यावेळी रिंकूने व्यक्त केल्या.