Rinku Rajguru Lavani : ‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरू घराघरांत लोकप्रिय झाली. या चित्रपटामुळे तिला ‘आर्ची’ ही नवीन ओळख मिळाली. विविधांगी भूमिका साकारून रिंकू कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत असते. मात्र, अभिनयाच्या जोडीला रिंकू उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे. अभिनेत्री अनेकदा प्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटीलच्या डान्स स्टुडिओमध्ये विविध सदाबहार गाण्यांवर सादरीकरण करते. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी रिंकू व आशिष पाटील यांनी मिळून “निगाहें मिलाने को जी चाहता है” या गाण्यावर डान्स केला होता. आता अभिनेत्रीने सादर केलेल्या लावणी नृत्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या “राजसा जवळी जरा बसा” या लावणी गीतावर रिंकूने सुंदर सादरीकरण केलं आहे. नऊवारी साडी, डिझायनर ब्लाऊज, नाकात नथ, गळ्यात हार, पायात घुंगरू अशा मराठमोळ्या लूकमध्ये रिंकूने लावणी सादर केली आहे. तिला या गाण्यावर डान्स करताना कोरिओग्राफर आशिष पाटीलने साथ दिली आहे.

रिंकू आपल्या भावना व्यक्त करत म्हणते, “पिढ्यांचा वारसा असणारी लावणी. लहानपणापासून लावणीशी जोडलेल्या असंख्य गोड आठवणी मनात साठलेल्या आहेत. बऱ्याच वर्षांनी पुन्हा लावणी करण्याचा छोटा प्रयत्न केला आहे आणि तुमच्याबरोबर हा व्हिडीओ शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. थँक्यू आशिष पाटील… तुझ्यामुळे माझ्या बालपणीच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या. आम्ही यासाठी जास्त सराव केला नव्हता. ही लावणी मी माझी आवड म्हणून फक्त २ तास सराव करून सादर केली आहे.”

Award Banner

रिंकू व आशिष यांचं सादरीकरण पाहून डान्सिंग क्वीन अमृता खानविलकरने या व्हिडीओवर “ओह लव्ह लव्ह” अशी कमेंट केली आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा रिंकूच्या डान्स व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अतिसुंदर…कोणाकडे पाहायचं दोघंही उत्तम डान्सर”, “Uff रिंकू किती छान नाचलीस”, “क्या बात हैं! क्या नजाकत है क्या अदा है! वाह वा! रिंकू तू इतकी चांगली डान्सर आहेस हे माहीत नव्हतं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

दरम्यान, रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, नुकतीच ती ‘आशा’ या सिनेमात झळकली होती. आता रिंकू ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या मल्टीस्टारर सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.