Rinku Rajguru on Relationship: ‘सैराट’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू सध्या वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पुन्हा साडे माडे तीन या चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ‘पुन्हा साडे माडे तीन’च्या आधी तिने झिम्मा २, आशा अशा चित्रपटांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
आता रिंकूने एका मुलाखतीत प्रेमाबद्दल वक्तव्य केले आहे. तसेच, सध्या ती रिलेशनशिपमध्ये आहे का, यावरही तिने उत्तर दिले आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली आहे, हे जाणून घेऊ…
“सध्याची पिढी प्रेमाचा विचार…”
रिंकू राजगुरूने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत रिंकू म्हणाली की, मी सिंगल आहे. सध्या माझ्या आयुष्यात कोणीच नाहीये. पण, प्रेमावरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि मला असं वाटतं की, प्रेम ही जगातील सर्वांत सुंदर गोष्ट आहे आणि आता सगळ्यात जास्त मला त्याच गोष्टीची भीती वाटते.”
प्रेमाची भीती का वाटते, असे विचारल्यानंतर रिंकू राजगुरू म्हणाली, “सध्याची पिढी प्रेमाचा विचार वेगळ्या पद्धतीनं करते. मी अशी आहे की, जर मी प्रेमात पडले, तर माझ्यासाठी प्रेमच सर्व काही असतं. म्हणजे मी लग्नाचाच विचार करते. जे रिलेशनशिपमध्ये ओके असतात ते ठीक आहे. मला असं वाटतं की, आपण ज्यावेळी कोणामध्ये भावनिकरीत्या गुंततो, त्यावेळी किती नाही म्हटलं तरी आपण त्या माणसावर अवलंबून राहतो. आजकाल ती भीती असते. आजकाल कोणत्याही कारणावरून कोणीही कोणाला सोडू शकतं.”
पुढे ती म्हणाली, “आपल्या आई-वडिलांच्या काळात असं असायचं की समजून घेऊ, काहीतरी मार्ग निघेल. आता म्हणजे पर्याय इतके आहेत की, एखाद्या व्यक्तीचे वागणे खटकले की, लगेच दुसरा पर्याय शोधला जातो. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीची प्रचंड भीती वाटते की, कोणावर विश्वास ठेवायचा का? प्रेम केलं, तर ते टिकेल का? कोणी सोडून तर देणार नाही ना? कारण- मला वाटतं की, प्रेम असेल तर ते शेवटपर्यंत असावं आणि ते खरं असावं. त्याच्यामुळे माणसं आणि प्रेम या गोष्टींची मला आजकाल प्रचंड भीती वाटते.”
तिचे हे उत्तर ऐकल्यानंतर तिला विचारले गेले की, तू सिंगल असण्याचं हे कारण आहे का? त्यावर ती म्हणाली, “हो. मला जो व्यक्ती म्हणेल की, तू मरेपर्यंत माझी बायको राहशील. त्याच्याबरोबर मी लग्न करेन आणि छान राहीन. पण, सध्या मला रिलेशनशिपची भीती वाटते.”

