Sairat Movie 10 Years Completion: काही सिनेमे वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. सिनेमाची गोष्ट, कलाकारांचा अभिनय, त्यातील गाणी, संवाद या सगळ्यामुळेच एखादा सिनेमा प्रचंड गाजतो. दिग्दर्शक, निर्माते, कलाकार, संगीतकार, सिनेमॅटोग्राफर, लेखक या सर्वांवरच कौतुकाचा वर्षाव होतो. त्यांच्या कलाकृतीचे वर्षानुवर्षे कौतुक केले जाते. अशाच सिनेमांपैकी एक २०१६ ला प्रदर्शित झालेला सैराट हा सिनेमा आहे.

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमातून आर्ची व परशा ही पात्रे प्रेक्षकांच्या भेटीला आली. या दोन्ही पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांनी म्हटलेले संवाद, त्यांचे हावभाव, त्यांची लव्ह स्टोरी या सगळ्यालाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

बुलेट चालवणारी आर्ची, “मराठी समजत नाय, इंग्लिशमध्ये सांगू का?” असे म्हणणारी आर्ची किंवा काय बघतोय माझ्याकडं? असे म्हणणारी आर्ची असो, आजही सिनेमातील आर्ची व तिचे डायलॉग चाहत्यांना तोंडपाठ आहेत. तिच्या याच हटके आणि धाडसी स्वभावामुळे तिच्या प्रेमात पडणारा परशा आणि या सगळ्यात तिला साथ देणारे त्याचे लंगड्या व सल्या हे मित्र, या सगळ्यामुळे सैराटची ही गोष्ट प्रेक्षकांना भावली. या सिनेमात प्रेम, मैत्री याबरोबरच सामाजिक विषमतेवरही भाष्य करण्यात आलंय.

या सगळ्याला आणखी एका गोष्टीची जोड मिळाली, ती म्हणजे चित्रपतील गाणी. या सिनेमातील आताचं बया का बावरलं, सैराट झालं जी, झिंगाट, याड लागलं. या अजय-अतुल यांच्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ही लोकप्रियता आजही कमी झालेली दिसत नाही. आजही लोक या गाण्यांवर थिरकताना दिसतात.

२९ मार्च २०१६ ला प्रदर्शित झालेल्या सिनेमाला आता दहा वर्षे पूर्ण झाली आहे. रिंकु राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यांच्या अभिनयाचे, साधेपणाचे कौतुक झाले. या सिनेमाने १०० कोटींची कमाई केली होती.

रिंकू राजगुरूने शेअर केले खास फोटो

आता सिनेमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर रिंकु राजगुरूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने ‘सैराट’ ला दहा वर्षे पूर्ण झाली, असे लिहिले आहे. पुढे तिने सैराट सिनेमातील आणखी काही खास फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत तिने सिनेमाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, असे लिहिले. तसेच भावुक झाल्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच, काही चाहत्यांनीदेखील सिनेमाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर कलाकारांचे कौतुक केले. सिनेमाबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तेदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

सैराट हा सिनेमा इतका गाजला की त्याचा हिंदी, कन्नड, तेलुगु आणि बंगाली या भाषांमध्ये रिमेक झाले. आता सैराटमधून पदार्पण केलेले कलाकार आता सिनेसृष्टीत विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.