Riteish Deshmukh : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळाला. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रितेश व ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या टीमने एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला चित्रपटाची संपूर्ण टीम आणि रितेश-जिनिलीयाचे इंडस्ट्रीमधील जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते.

या पार्टीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये रितेश बॉलीवूड गाण्यावर डान्स करतोय आणि त्याने महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी अभिनेत्यावर टीका केली. हा महाराजांचा अपमान आहे, तसेच रितेशने मद्यपान केल्याचा दावाही ट्रोलर्सनी केला होता. या सगळ्या वादावर आता अखेर रितेशने एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आहे.

रितेश देशमुखने सर्वप्रथम “मी मद्यपान करत नाही, भविष्यातही करणार नाही” हे स्पष्ट केलं आहे. तसेच पार्टीच सहभागी होण्यापूर्वी टी-शर्ट बदलणं का राहून गेलं याचं कारण सांगत रितेशने दिलगिरी व्यक्त केली आहे. एक शिवप्रेमी या नात्यानं अभिनेत्याने हे निवेदन जारी केलं आहे.

रितेश देशमुखची पोस्ट

नमस्कार, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसाद दिला. या सिनेमाच्या यशाच्या आनंदानिमित्त आमच्या संपूर्ण टीमने एक छोटेखानी आनंदोत्सव आयोजित केला होता. त्यानंतर माझा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. एक शिवप्रेमी या नात्यानं मी याचं स्पष्टीकरण देणं माझं कर्तव्य मानतो.

मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला टी-शर्ट परिधान करून आनंद साजरा करण्यामागे त्यांचा अवमान करण्याचा माझा किंचितही हेतू नव्हता. तो टी-शर्ट मी चित्रपटाच्या प्रचारादरम्यान वापरत होतो. त्या दिवशीही मी प्रचारकार्य पूर्ण करून थेट कार्यक्रमात सहभागी झालो असल्याने टी-शर्ट बदलणं राहून गेलं.

तसेच, माझ्याबाबत समाजमाध्यमांवर होत असलेल्या काही दाव्यांविषयीही स्पष्ट करू इच्छितो की, मी आजवर कधीही मद्यपान केलेले नाही आणि भविष्यातही करणार नाही. त्यामुळे या संदर्भातील कोणतेही आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत.

विशेष म्हणजे, हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीला संबंधित कार्यक्रमाचं निमंत्रणदेखील देण्यात आलेलं नव्हतं. या कार्यक्रमाचं आयोजन ‘राजा शिवाजी’ या चित्रपटासाठी साडेतीन वर्षे अथक परिश्रम घेतलेल्या, कॅमेरामागील आणि कॅमेरासमोरील सर्व कलावंत व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करण्यात आलं होतं. तथापि, माझ्या त्या कृतीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील, तर एक शिवप्रेमी म्हणून मी मनःपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो.

छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे, प्रेरणेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्याविषयी माझ्या मनात अत्यंत आदर, प्रेम आणि निष्ठा आहे. ही भावना आजही तितकीच दृढ आहे आणि कायम राहील. जय शिवराय! आपला, रितेश विलासराव देशमुख

riteish deshmukh
रितेश देशमुखची पोस्ट

दरम्यान, ‘राजा शिवाजी’ सिनेमा १ मे रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर १२० कोटींहून अधिक कमाई करणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. रितेश देशमुखसह जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सचिन खेडेकर, भाग्यश्री, अमोल गुप्ते, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर अशा दमदार कलाकारांची यामध्ये मांदियाळी आहे.