अभिनेता रितेश देशमुखचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राजा शिवाजी’ चा दमदार फर्स्ट लूक टीझर आता प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष बाब अशी की हा खास अनुभव केवळ चित्रपटगृहांमध्येच पाहायला मिळणार आहे. होय. तुम्हाला ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा हा फर्स्ट लूक टीझर ‘धुरंधर-द रिव्हेंज’ या चित्रपटाबरोबर थिएटरमध्ये दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आज १८ मार्चपासून सुरू होणाऱ्या सशुल्क प्रिव्ह्यूद्वारेही या भव्य ऐतिहासिक चित्रपटाची पहिली झलक पाहण्याची संधी मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रवासाची सिनेमॅटिक झलक मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, अशातच आता रितेशने गुड न्यूज दिली आहे. त्यामुळे धुरंधर २ बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना टीझर पाहायला मिळणार आहे. रितेश विलासराव देशमुखची प्रमुख भूमिका असलेला आणि त्याने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आहे. या चित्रपटात भारतातील एका महान योद्धाची गाथा, त्याचा स्वराज्य स्थापनेचा संघर्ष पाहायला मिळेल.
रितेश देशमुखची पोस्ट
पहिलं नमन माझ्या राजाला!
आपला राजा.. आपला अभिमान..
‘राजा शिवाजी’ ची पहिली झलक ‘धुरंधर 2’ चित्रपटातून आपल्या भेटीला
घेऊन येत आहेत आपल्या राजाची गाथा – कधीही न पाहिलेल्या अभूतपूर्व रूपात!!!
राजा शिवाजी १ मे २०२६ पासून चित्रपटगृहांत.., असं कॅप्शन देत रितेश देशमुखने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.
या भव्य ऐतिहासिक कलाकृतीत संगीताची जादू अजय-अतुल यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार संतोष सिवन यांनी आपल्या अप्रतिम छायाचित्रणातून या गाथेला भव्य दृश्यरूप दिले आहे. भाषिक आणि भौगोलिक सीमा ओलांडत भारताचा समृद्ध इतिहास आणि वारसा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या निर्मात्यांचा उद्देश आहे.
जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शौर्य, सन्मान आणि स्वराज्याचा प्रवास दाखवणारी ही ऐतिहासिक गाथा प्रेक्षकांना एका विलक्षण सिनेमॅटिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.
शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने त्याच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले होते. त्याच्या हातात फडकणारा भगवा ध्वज, चेहऱ्यावरील करारी भाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीवर उभे असलेले त्याचे व्यक्तिमत्व महाराजांच्या शौर्याची प्रचिती देणारे होते. या ऐतिहासिक घोषणेनंतर चित्रपटसृष्टीतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आता चाहत्यांना फर्स्ट लूक टीझर पाहायला मिळणार आहे.
