रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत. दोघांचाही प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. रितेश व जिनिलीया यांना त्यांचे मराठी प्रेक्षक प्रेमाने महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी असं सुद्धा म्हणतात. जिनिलीया आणि रितेश यांच्या नात्याचं त्यांचे चाहते नेहमीच कौतुक करत असतात. दोघेही कायम एकमेकांबरोबर खंबीरपणे उभे असतात. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्रीनेसुद्धा या जोडीचं कौतुक केलं असून ते इतर जोडप्यांसाठी आदर्श आहेत असं म्हटलं आहे.
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख अलीकडे त्यांच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत होते. दोघांनीही या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या तर अभिनेत्री भाग्यश्रीने राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली. रितेश जिनिलीया यांच्या ‘राजा शिवाजी’ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता अभिनेत्री भाग्यश्रीने रितेश देशमुख अभिनित आणि दिग्दर्शित आणि जिनिलीया देशमुख निर्मित या चित्रपटात त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्या दोघांच्या नात्याबद्दलही भाष्य केलं आहे.
व्हरायटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने रितेश आणि जिनिलीया यांच्याबद्दल बोलताना त्यांचं कौतुक केलं आहे. जिनिलीयाबद्दल बोलताना भाग्यश्री म्हणाली, “निर्माती म्हणून तिने सर्व गोष्टींमध्ये समतोल साधला. तर रितेशनेसुद्धा या चित्रपटात त्याच्याकडे जे जे काही होतं त्या सगळ्याची गुंतवणूक केली. त्याचं खूप मोठं स्वप्न होतं.”
अनेकांसाठी रितेश व जिनिलीया आदर्श आहेत – भाग्यश्री
रितेश व जिनिलीया यांच्याबद्दल भाग्यश्री पुढे म्हणाली, “नवरा बायकोम्हणून एकत्र काम करत असतानाही त्यांच्यामध्ये जी मैत्री असते ती खूप छान आहे. ती खूप कठीण गोष्ट असते. कारण जेव्हा तुम्ही संवेदनशील विषयावर काम करत असता तेव्हा दिग्दर्शक आणि निर्माता यांच्यामध्ये मतभेद होऊ शकतात. पण, त्यांनी हे खूप सहजपणे केलं. त्यामळे आजच्या काळातील अनेक जोडप्यांसाठी ते आदर्श आहेत.”
दरम्यान, रितेश आणि जिनिलीया यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे आणि त्यांनी चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना खूप आवडते. त्यामुळे या जोडीला एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात.
