Riteish Deshmukh Genelia Parenting : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि आदर्श जोडी म्हणून रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचे नाव आवर्जून घेतले जाते. या दोघांमध्ये एकमेकांबद्दल असणारे प्रेम, आदर आणि भावना यांचे अनेकदा कौतुक केले जाते. ग्लॅमरच्या दुनियेमध्ये लोकप्रिय असूनही त्यांच्यामध्ये असणारा नम्रपणा त्यांनी दोन्ही मुलांमध्येही रुजवला आहे. पापाराझींसमोर नम्रतेने हात जोडणारे रियान आणि राहिल यांच्यावरील चांगले संस्कार अनेकदा दिसून येतात. आजच्या काळात ते दोघं मुलांवर कसे संस्कार करतात याबाबत रितेश-जिनिलीया यांनी सांगितले आहे. मुलांचे संगोपन करताना एक नियम ते काटेकोरपणे पाळत असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
‘बॉम्बे टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रितेश देशमुख व जिनिलीया यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या आहेत. अनेकदा रितेश-जिनिलीया यांच्यासह त्यांची दोन्ही मुलं दिसून येतात. या दोन्ही मुलांनी नुकतेच ‘राजा शिवाजी’ या चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केले आहे. आई-वडील प्रसिद्धीच्या झोतात असूनही रियान आणि राहिल यांच्यातील नम्रपणा, साधेपणा आणि मोठ्यांचा आदर करण्याची वृत्ती पाहून अनेक जण रितेश-जिनिलीयाच्या पालकत्वाचं कौतुक करतात. या मुलाखतीमध्ये जिनिलीयाने आम्ही मुलांसमोर कधीच आमचे मतभेद मांडत नसल्याचे सांगितले आहे.
मुलांना समजवताना रितेश ‘हे’ वागत नाही – जिनिलीया
जिनिलीया म्हणाली, “माझ्या आणि रितेशमध्ये कधीतरी मतभेदसुद्धा असतात, आमची मतं वेगळी असू शकतात. पण, ते आम्ही कधीच मुलांसमोर दाखवत नाही. मुलांसमोर आम्ही नेहमी एकाच टीममध्ये आहोत असे दाखवतो. असं कधीच होत नाही की मी मुलांना काहीतरी शिकवत आहे आणि तेव्हाच रितेश मागून मुलांना, ये इकडे माझ्याकडे मी चॉकलेट देतो, असं कधीच म्हणत नाही.”
आमच्या कुटुंबामध्ये ‘हा’ एक नियम आम्ही पाळतोच
पुढे ती म्हणाली, “कधीतरी माझं जे म्हणणं किंवा मी जे बोलतीये ते रितेशला पटत नसतं, पण ते तो मला मुलांसमोर सांगत नाही. नंतर तो मला या गोष्टी सांगतो. कारण मुलांसमोर आम्ही दोघं एक असतो आणि आमची एक टीम असते, त्यामुळे आता त्या दोघांचीही टीम झाली आहे. पण, कुटुंबामध्ये आणि आमच्यामध्ये आम्ही काही नियम पाळतो. मान राखण्याबाबत आमच्याकडे कोणतीही हयगय सहन केली जात नाही. रिस्पेक्टच्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही. आमच्यासाठी एखाद्याचा सन्मान राखणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.”
रितेश देशमुख व जिनिलीया या लोकप्रिय जोडीचा मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीतसुद्धा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. रितेश-जिनिलीया जवळपास १० वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यांची पहिली भेट २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. २००२ ते २०१२ अशी १० वर्षे हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. ३ फेब्रुवारी २०१२ मध्ये या जोडप्याने लग्न केले. त्यांना रिआन व राहिल अशी दोन मुलं आहेत. दोन्ही मुलांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून पदार्पण केले आहे. रितेश देशमुख यांच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.
